हरभरा पिक येईल जोरात, नुकसान टाळण्यासाठी करा या उपाययोजना, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अमरावती जिल्ह्यात जवळपास आता हरभरा पिकाची पेरणी आटोपली आहे. काही क्वचित शेतकरी बाकी आहेत. पेरणी नंतर हरभरा पिकाची काळजी कशी घ्यावी त्याबाबत जाणून घेऊ.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : जिल्ह्यात जवळपास सर्वत्र हरभऱ्याची पेरणी होत आली आहे. सोयाबीनची काढणी झाली की शेतकरी लगेच हरभऱ्यासाठी शेतीची मशागत करतात. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत हरभरा पेरणी आटोपली जाते. भरपूर उत्पन्न घेण्यासाठी हरभरा पिकाची काळजी शेतकरी घेतात. तेव्हा अनेक चुका होतात आणि मग हरभरा पिकाचे नुकसान होण्यास सुरुवात होते. ते नुकसान टाळण्यासाठी हरभरा पिकाची काळजी कशी घ्यावी? याबाबत अमरावतीमधील कृषी तज्ज्ञ श्यामसुंदर ताथोडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
नुकसान टाळण्यासाठी हरभरा पिकाची काळजी कशी घ्यावी?
आता काही शेतकऱ्यांची हरभरा पेरणी अजूनही बाकी आहेत. त्यांनी आता जास्त लेट येणारे वान पेरणीसाठी वापरू नये. विजय, दिग्विजय, 92/18, दप्तरी 21 या सारखे वान वापरावे. त्यानंतर हरभरा पिकांवर सर्वात जास्त धोका असतो तो म्हणजे मर रोगाचा. मर रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया खूप महत्वाची आहे. त्यासाठी बुरशी नाशक आणि कीटकनाशकांचा वापर करावा. झेलोरा, वार्डन, इलेक्ट्रॉन आणि यासोबतच गवचो घेतलं तर आपल्या पिकाचे संरक्षण करता येते, असं कृषी तज्ज्ञ श्यामसुंदर ताथोडे सांगतात.
advertisement
त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मर ही बिजप्रकियेने थांबणारी नाही. मर रोगाचे महत्त्वाचे कारण म्हणजे पीक हे 5 ते 6 इंच वाढले की त्याच्या मुळाशी कोरड निर्माण होते. ओलावा राहत नाही, त्यामुळे ओलावा टिकून ठेवण्यासाठी 5 ते 6 इंचाचे पीक झाल्यावर त्याला ओलित करणे गरजेचे आहे. तुषार सिंचन तुम्ही देऊ शकता, यामुळे सुद्धा पिकाला भरपूर फायदा होतो, असं कृषी तज्ज्ञ श्यामसुंदर ताथोडे सांगतात.
advertisement
तिसरा मुद्दा आहे पिकं हे अवास्तव वाढू द्यायचे नाही. त्यासाठी वाढ रोधकांचा वापर करू शकता. ज्यामध्ये लिओसीन, डोंगल, विद्युत यांचा समावेश होतो. या वाढ रोधकांचा वापर करताना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे. जेव्हा हरभऱ्याला कळ्या यायला लागतात तेव्हा या वाढ रोधकांचा वापर करू शकता. नंतर मग जेव्हा अळी यायला सुरुवात होते, तेव्हा एखादं अळी नाशक, अंडी नाशक वापरावं. अळीसाठी बंदोबस्त म्हणून तुम्ही पक्षांना थांबण्यासाठी जागा जर केली तर ते पूर्ण अळी खाऊन घेतात, पिकाचे नुकसान होण्यापासून वाचवू शकता. याप्रकारे तुम्ही हरभरा पिकाची काळजी घेऊ शकता, असेही त्यांनी सांगितले.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Nov 28, 2024 4:26 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
हरभरा पिक येईल जोरात, नुकसान टाळण्यासाठी करा या उपाययोजना, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला









