सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील शेतकरी योगीनाथ पटणे यांनी एक एकरात कारल्याची लागवड केली असून उत्पन्न देखील चांगले मिळवले आहे. पूर्वी प्रामुख्याने द्राक्ष हे प्रमुख पीक घेतले जात असे. मात्र नंतरच्या काळात उत्पादनावर होणारा परिणाम, वाढता उत्पादन खर्च ही आव्हाने निर्माण झाल्याने द्राक्ष बाग काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कारले लागवडीला एक एकरात 50 हजार रुपये पर्यंत खर्च आला असून 3 महिन्यात 2 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न शेतकरी योगिनाथ पटणे यांना मिळाले आहे.
advertisement
गेल्या 10 वर्षांपासून योगीनाथ पटणे हे कारले लागवड करत आहेत. त्या अनुभवातून आलेल्या अडचणींवर टप्प्याटप्प्याने मात करत सुधारणा केल्या आहेत. लागवड करण्यापूर्वी भरखते दिली जातात. त्यानंतर द्राक्ष बागेतील उपलब्ध स्ट्रक्चरनुसार 3 बाय 8 फूट या अंतराने लागवड करण्यात येते. दोन रोपांत 3 फूट आणि दोन ओळींमध्ये 8 फुटांची जागा मोकळी राखली आहे.
सांगलीच्या शेतकऱ्याची कमाल, एकरी 10 लाखांचं उत्पन्न, नेमका काय फॉर्म्युला वापरला?
कारल्याच्या वेलींना आधार दिल्यास त्यांची वाढ चांगली होते. तसेच नवीन फुटीच्या वाढीला चांगला वाव मिळतो. फळधारणा चांगली होते. दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळण्याकरिता वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीच्या आधाराने वाढवणे फायदेशीर ठरते,असं शेतकरी योगिनाथ पटणे सांगतात.
लागवडीनंतर साधारणपणे 60 ते 65 दिवसानंतर फळ तोडणीस येतात. सुरुवातीच्या टप्प्यात तुलनेने कमी माल निघतो. मात्र नंतरच्या काळात उत्पादन वाढू लागताच मजुरांचे नियोजन करून काढणीच्या कामांस सुरुवात केली जाते. तोडणी झाल्यानंतर कारल्याची सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विक्रीसाठी पाठवले जाते. या कारले लागवडीतून 2 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी योगिनाथ पटणे यांनी सांगितले आहे.





