सुरुवातीला कविता यांना कोणतेही स्थिर उत्पन्नाचे साधन नव्हते. त्यांच्या पतीकडेही शासकीय नोकरी नव्हती. दोघांनी मिळून मजुरीच्या कामातून थोडे पैसे जमवून गावात किराणा दुकान सुरू केले. मात्र, या व्यवसायातून फारशी कमाई होत नव्हती. घरखर्च भागवणेही कठीण होत होते.
अशा कठीण परिस्थितीत कविता कोटलवार यांना शासनाच्या ‘उमेद अभियान’ विषयी माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ बचत गटाची स्थापना केली आणि याच गटाच्या माध्यमातून व्यवसायाची वाटचाल सुरू झाली. उमेद अभियानाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी मसाले उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
त्यांनी सुरुवातीला खारोडी मसाले, राजगिऱ्याचे लाडू, हळद पावडर, गूळ चहा पावडर यांसारखे पारंपरिक उत्पादने तयार केली. त्यांच्या गुणवत्तेमुळे ही उत्पादने लवकरच प्रसिद्ध झाली. मुंबईच्या महालक्ष्मी सरल प्रदर्शनात सहभाग घेतल्यावर त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळू लागली.
आज कविता कोटलवार यांचा मसाल्यांचा ब्रँड राज्यभर पोहोचला आहे. या उद्योगातून त्या स्वतः चांगली कमाई करत आहेत आणि आठ ते दहा महिलांना रोजगारही देत आहेत. एक साधी महिला उद्योजिका बनली आणि इतर महिलांसाठी प्रेरणा ठरली – हीच त्यांच्या यशाची खरी खूण आहे.
कवितांचा मजुरीपासून उद्योजकतेपर्यंतचा प्रवास हा ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाचा उत्तम आदर्श ठरतो. त्यांच्या यशोगाथेने ‘इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो’ हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.