मुंबई : अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांची नासाडी, जमिनीतील पाणी साचणे आणि पशुधनाचे मोठे नुकसान या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी २ हजार २१५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
ही मदत मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून जाहीर झाली असून, राज्यातील तब्बल ३१ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जवळपास ६९ लाख हेक्टर जमीन बाधित झाली आहे. या जमिनीवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे अहवालांवरून स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
सरकारच्या या निर्णयामुळे नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दिवाळीपूर्वी मदत मिळणार आहे. यापूर्वीच कृषीमंत्री यांनी दिलेले आश्वासन कायम ठेवत, सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत पोहोचविण्याची तयारी केली जाण्याची शक्यता आहे.
कोणाला लाभ मिळणार?
जून २०२५ ते ॲागस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले होते. त्याकरिता ही मदत असणार आहे. सध्या मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत.
३० जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. मराठवाडा, विदर्भ विभागासह अनेक जिल्हे पावसाने सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनी पाण्याखाली राहिल्याने आगामी रब्बी हंगामासाठी जमीन तयार करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.