राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडणार असून, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार संयुक्त पत्रकार परिषदेत पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीचे निकष बदलण्याची शक्यता
सध्या सरकारकडे अतिवृष्टी घोषित करण्यासाठी काही ठराविक निकष आहेत. त्यानुसार, एखाद्या भागात एकूण ६५ मिलिमीटर पाऊस किंवा सलग पाच दिवस दररोज १० मिलिमीटर पाऊस पडल्यास तो भाग अतिवृष्टीग्रस्त मानला जातो.
advertisement
मात्र, यंदा अनेक ठिकाणी एवढा पाऊस न पडताही, नद्यांना आलेल्या पूरपाण्यामुळे शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे “त्या भागात किती पाऊस झाला?” या निकषाऐवजी प्रत्यक्ष नुकसानाच्या आधारावर मदत देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाला, तर हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे पूर आणि अतिवृष्टीमुळे प्रभावित भागांतील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे अधिक सुलभ होईल.
सरकारकडून विविध मदतींचा विचार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, “ओल्या दुष्काळाच्या काळात जशी मदत दिली जाते, तशीच मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.”
त्याअंतर्गत खालील उपाययोजना प्रस्तावित आहेत. जसे की, शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन आणि व्याज सवलत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमाफी, घर दुरुस्ती आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी विशेष निधी
याशिवाय, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध कंपन्या आणि सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्यांनी आरोग्य किट, कपडे, अन्नधान्य, शालेय साहित्य आणि आवश्यक वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. ही वस्तूंची वितरण मोहीम पुढील दोन-तीन दिवसांत सुरू होईल.
जमिनीच्या मोबदल्यात वाढ प्रस्तावित
सध्या राज्य सरकारच्या नियमांनुसार, दुरुस्त न होणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी ४७,००० रुपये, खरवडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी १८,००० रुपये मदत दिली जाते. मात्र, मदत आणि पुनर्वसन विभागाने दोन्ही प्रकारच्या नुकसानासाठी समान दराने आणि अधिक रकमेची मदत देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, शेतकऱ्यांना अधिक आर्थिक आधार मिळेल आणि पुनर्बांधणी प्रक्रियेला गती मिळेल.
दरम्यान, अनेक जिल्ह्यांतील शेतकरी अजूनही सरकारी मदतीकडे आस लावून आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठ्या मदत पॅकेजची घोषणा झाली, तर या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिलासा मिळेल.