मुंबई महापालिका निवडणुकीला वेग, निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Mumbai Mahanagar Palika election: राज्य निवडणूक आयोगाने रात्री उशिरा मुंबई महानगर पालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आता या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने हालचाली करायला सुरुवात केली असून निवडणूक प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने रात्री उशिरा मुंबई महानगर पालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. त्यामुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीला वेग आला आहे. आता सर्वांचं लक्ष आरक्षण सोडतीकडे लागलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेची प्रभाग रचना मध्यरात्री जाहीर करण्यात आली. पालिकेने तयार केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती, सूचना मागवल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली. यानंतर आरक्षण सोडत आणि नंतरच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे.
प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींवर २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या हरकती, सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यावर १० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर हे तीन दिवस मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉइंट, या ठिकाणी सुनावणी घेण्यात आली. यानंतर मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध टप्पे निश्चित करण्यात आले. याअंतर्गत २२ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना जारी करण्यात आली होती.
advertisement
अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा सरकारचा मानस असल्याचं दिसून येत आहे. नवीन वर्षात मुंबई महापालिकेची निवडणूक देखील पार पडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी जुलै २०२६ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल. अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्याने आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 8:38 AM IST