मांजरा धरण 80% क्षमतेवर
बीड जिल्ह्यातील धनेगाव येथे असलेल्या मांजरा प्रकल्पाचा पाणीसाठा अवघ्या 18 तासांत तब्बल 22 टक्क्यांनी वाढला आहे. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 57 टक्के असलेला पाणीसाठा 16 ऑगस्ट रोजी सकाळी 80 टक्क्यांवर पोहोचला. या धरणातून बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 22 गावांना पाणीपुरवठा केला जातो तसेच शेतीसाठीही या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे पुढील दोन वर्षांकरिता पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
advertisement
सहस्त्रकुंड धबधबा अक्राळविक्राळ
नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदी पुरसदृश्य स्थितीत आली असून, सहस्त्रकुंड धबधब्याला अक्राळविक्राळ स्वरूप प्राप्त झाले आहे. इसापूर धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून तब्बल 4,988 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बेंबळा धरणाचे चार दरवाजे उघडले
यवतमाळच्या बेंबळा प्रकल्प क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणाची क्षमता वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी 7 वाजता चार गेट प्रत्येकी 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, 84 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी या भागातील नदीकाठच्या गावांना पूरस्थितीची शक्यता असल्याने खबरदारीचे निर्देश दिले गेले आहेत.
पिकांचे मोठे नुकसान, गावांचा संपर्क तुटला
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील कोथाळा, साळेगाव, मोगरा यासह पंधरा गावांमध्ये अतिवृष्टी झाली. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेतं तलावामध्ये रूपांतरित झाली असून, शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीपात्रात पाणी ओसंडून वाहत असल्याने माजलगाव तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, एकीकडे धरणे भरू लागल्याने जलसाठा वाढला आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, गावांचा संपर्क तुटणे आणि पायाभूत सुविधांना फटका बसणे अशा घटनांनी प्रशासनाला धावपळ करावी लागत आहे. पावसाचा फायदा आणि तोटा एकाचवेळी दिसत असल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर बनली आहे.
