या विशेष दिवशी सांगली बाजार समितीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. एकूण 14 कोटी रुपयांच्या हळदीचा व्यवहार यावेळी नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे, यावर्षीचा हळद हंगाम जवळपास 90 टक्के पूर्ण झाला असूनही, अजूनही दररोज 5,000 ते 7,000 क्विंटलपर्यंत हळदीची विक्री नियमितपणे सुरू आहे. यावरून हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असलेला उत्साह स्पष्टपणे जाणवत आहे.
advertisement
अक्षय तृतीयेला पार पडलेल्या या सौद्यांमध्ये मध्यम प्रतीच्या राजापुरी हळदीला 14,500 रु ते 16,000 रु असा चांगला दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला माल बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणला होता. त्यांना मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकरी वर्ग अत्यंत आनंदित असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले.
या दरवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीला जास्त भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शिल्लक हळद देखील विक्रीसाठी आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संपूर्ण बाजारात एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. हळदीच्या चांगल्या गुणवत्तेमुळे व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर खरेदी करत सौदे लवकर पूर्ण केले. परिणामी, बाजारात मार्केटिंग प्रक्रिया जलद गतीने पार पडत असल्याचे चित्र दिसून आले.
