शेतकऱ्यांपुढील आव्हाने
मृदविज्ञान अभ्यासक सांगतात की, पुढील तीन ते चार हंगामांमध्ये शेतकऱ्यांना कडक जमिनीत पेरणी आणि उत्पादन या दोन्ही बाबींमध्ये अडचणींचा सामना करावा लागेल. सेंद्रिय कर्ब व पोषक घटकांचा थर वाहून गेल्याने जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, मृद संधारणासाठी आणि धूप प्रतिबंधक उपाययोजनांसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.
advertisement
माती वाहून गेल्याने परिणाम काय?
पोषक घटक कमी झाल्यामुळे पिकांचे उत्पादन घटेल.
जलधारण क्षमता कमी होऊन पिकांना पुरेसं पाणी मिळणार नाही.
वाळूचा थर वाढल्याने पिकांची वाढ खुंटू शकते.
तज्ज्ञांचे मत काय?
तज्ज्ञांच्या मते. “सुपीकता परत आणण्यासाठी कंपोस्ट, शेणखत यांचा वापर वाढवावा लागेल आणि माती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. पुरामुळे मातीबरोबर अन्नद्रव्यांचाही मोठा नाश झाला आहे. त्यामुळे सुपीकता कमी होऊन उत्पादकतेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. सातत्यपूर्ण आणि वैज्ञानिक उपाययोजनांची गरज आहे.”
उपाय काय?
शेतकऱ्यांना आता मातीचा पोषक थर पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी,
कंपोस्ट व शेणखताचा वापर वाढवावा.
मूग, हरभरा यांसारखी मातीचा बचाव करणारी पिके घ्यावीत.
मातीनुसार पीक निवड करावी आणि पिकांची फेरबदल पद्धत अवलंबावी.
मृद संवर्धन व धूप प्रतिबंधासाठी बंधारे, गाळकुंड यांसारखी कामे करावी लागतील.
महाराष्ट्राची शेती आणि धोका
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि.मी. असून, यातील मोठा भाग शेतीखाली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींचा फटका थेट कृषी क्षेत्राला बसतो. यंदाच्या अतिवृष्टीने या वास्तवाला आणखी अधोरेखित केले आहे.
एकूणच, राज्यातील शेतकऱ्यांपुढे सध्या सर्वात मोठे आव्हान म्हणजे जमिनीची सुपीकता परत मिळविण्याचे आहे. त्यासाठी दीर्घकालीन नियोजन, मृदा संवर्धन आणि वैज्ञानिक शेती पद्धतींचा अवलंब आवश्यक आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, योग्य उपाययोजना केल्यास शेतजमिनी पुन्हा पूर्ववत करता येतील, मात्र त्यासाठी वेळ, परिश्रम आणि खर्च हे तीन घटक अपरिहार्य ठरणार आहेत.