अमरावती : जिल्ह्यांत यावर्षी सोयाबीन पिकाचे क्षेत्र बऱ्यापैकी होते. पण, पावसामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाची काढणी होऊन जवळ पास एक महिना होत आला. मात्र सोयाबीनला पाहिजे तसा भाव मिळत नाहीये. शेतकरी कर्ज बाजारी होऊन शेती करतो. शेतमाल घरी आला की कर्ज देणारा व्यक्ती वारंवार घरी येतो आणि कर्ज परतफेडीसाठी शेतकऱ्याच्या मागे लागतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने काय करावं? हा मोठा प्रश्न आहे. शेतकरी अजूनही सोयाबीन भाववाढ होईल या आशेवर आहेत.
advertisement
सुरुवातीपासूनच सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना आता भाववाढ होईल अशी आशा होती. पण, 2200 पासून ते 3800 रुपयांपर्यंत भाव सध्या सोयाबीनला मिळत आहे. अमरावतीमधील शेतकऱ्यांशी लोकल 18 च्या प्रतिनिधीने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, या वर्षी सोयाबीन शेती ही तोट्यात आहे. लागत खर्च सुद्धा निघणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मोसंबी शेतीतून होईल बक्कळ कमाई, पण मृग बहरात या तारखेनंतरच करा विक्री
शेतकरी मंगेश बनसोड सांगतात की, एक एकर शेतीला कमीत कमी 15 हजार रुपये लागत खर्च येतो. हा कमीतकमी खर्च आहे. यापेक्षाही जास्त येऊ शकतो. एकरी उत्पादन मला 5 ते 6 क्विंटल झालं आहे. 3500 हजार रुपयांनी सोयाबीन मागत आहे.
लागत खर्च निघेल पण फक्त 5 ते 6 हजार रुपये उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांचा नफा यात काहीच होणार नाही. इतर शेतकरी आहेत ज्यांना एकरी एक क्विंटल असा उतारा लागला आहे. त्यांनी काय करावं? काही शेतकऱ्यांनी सरळ रोटवेटर फिरवले, म्हणजेच यावर्षी शेतकरी खूप हतबल झाला आहे. सोयाबीनला मिळेल या आशेवर अजूनही आम्ही सोयाबीन घरातच ठेवली आहे. कमीत कमी खर्च निघेल इतका तरी भाव सोयाबीनला मिळायला पाहिजे. शेती ही काहीच परवडत नाही. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती सध्या आहे. शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींवर जीएसटी लावलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा आपोआप खाली होत आहे. शेतकऱ्यांवरचा भर सरकारने कमी करायला पाहिजे, असे ते म्हणाले.
बापरे! एवढं मोठं सीताफळ, 3 माणसं लागतील संपवायला, जालन्यातील शेतकऱ्याची कमाल
महिला शेतकरी निर्मला पापडकर सांगतात की, दोन एकरमध्ये सोयाबीन होते. पिकावर रोग आला. त्यामुळे मला फक्त पाच क्विंटल सोयाबीन झाले. खूप कमी भावात व्यापारी मागत आहेत. कर्ज काढून शेती केली आहे. 50 हजार रुपये कर्ज काढले, 30 ते 35 हजार रुपये शेतात लागत खर्च आणि 15 हजार रुपये इतर खर्च झालाय. सोयाबीनला भाव नाही कर्ज फेडायचे आहे. भाववाढ होईल या आशेवर अजूनही सोयाबीन घरीच आहे काय करावं? आता काहीच कळतं नाही सर्व आता सरकार आणि वरच्याच्या म्हणजेच देवाच्या हाती आहे, असे त्या म्हणाल्या.





