मुंबई : राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून, ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह विरोधकांकडून जोरदारपणे होत आहे. मात्र, ओला दुष्काळ म्हणजे नेमके काय? तो कधी आणि कसा जाहीर केला जातो, सरकार याबाबत खरोखर टाळाटाळ करतेय का? या प्रश्नांची चर्चा सध्या राज्यभर रंगली आहे.
advertisement
दुष्काळ म्हणजे काय?
दुष्काळाची सामान्य व्याख्या म्हणजे ठराविक भागात पाणीटंचाई निर्माण होणे आणि स्थानिक लोकांना पिण्याचे पाणीही उपलब्ध न होणे. हा दुष्काळ केवळ कमी पावसामुळेच पडतो असे नाही, तर हवामानातील बदल, मानवी हस्तक्षेप किंवा चुकीच्या जलव्यवस्थापनामुळेही ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर पाण्याची मागणी आणि पुरवठा यामधील तफावत म्हणजे दुष्काळ.
दुष्काळाचे प्रकार
सुका दुष्काळ : कमी पाऊस, कोरडे हवामान आणि पाण्याची टंचाई ही या परिस्थितीची लक्षणे आहेत. पेरणी झाल्यानंतर पाऊस न पडल्याने पिके जळून जातात, जमिनीत भेगा पडतात.
ओला दुष्काळ : याउलट, अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान होते, शेतमाल वाहून जातो आणि शेतीयोग्य माती नष्ट होते. ही परिस्थिती ‘ओला दुष्काळ’ म्हणून ओळखली जाते. ग्रामीण भागात ही संज्ञा प्रामुख्याने वापरली जाते, कारण पावसाचा थेट परिणाम शेतीवर होतो.
ओला दुष्काळाची व्याख्या आणि निकष काय आहेत?
ओला दुष्काळ ही कोरड्या दुष्काळाच्या विरुद्ध परिस्थिती आहे. ठराविक भागात सातत्याने व अतिप्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेती व शेतमालाचे मोठे नुकसान झाल्यास त्या परिस्थितीला ओला दुष्काळ म्हणतात. एका दिवशी ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यास त्याला ‘अतिवृष्टी’ मानले जाते. जर त्या अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाले, तर तो भाग ‘ओला दुष्काळग्रस्त’ म्हणून घोषित करता येतो.
सरकारची भूमिका आणि वाद
विरोधकांचा आरोप आहे की, सरकार ओला दुष्काळ घोषित करण्यास टाळाटाळ करत आहे. मात्र, शासनाच्या नियमावलीनुसार ‘ओला दुष्काळ’ वेगळ्या पद्धतीने जाहीर करण्याची अधिकृत तरतूद नाही. शासन प्रामुख्याने ‘अतिवृष्टीग्रस्त’ किंवा ‘पूरग्रस्त’ भाग जाहीर करून मदत वितरीत करते. त्यामुळे ‘ओला दुष्काळ’ हा शब्द प्रचलित असला तरी, प्रत्यक्षात सरकार त्याऐवजी आपत्ती व्यवस्थापनाच्या तरतुदींतर्गत मदत वाटप करते.
शेतकऱ्यांची अपेक्षा
सततच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी संकटात सापडतो आणि त्याला तातडीच्या मदतीची गरज भासते. त्यामुळे विरोधक सरकारवर दबाव आणत आहेत की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करावी. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ‘ओला दुष्काळ’ ही संज्ञा केवळ चर्चेत असली, तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ आणि प्रभावी निर्णय घेऊन सरकारला शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी लागणार आहे.