GST 2.0: नवरात्रीच्या मुहूर्तावर जीएसटी 2.0, कोणत्या जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
GST 2.0: दैनंदिन आयुष्यात गरजेच्या असलेल्या अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर: आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून 'जीएसटी 2.0' नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे दैनंदिन आयुष्यात गरजेच्या असलेल्या अनेक वस्तूंवरील जीएसटी मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. लोकल 18शी बोलताना छत्रपती संभाजीनगर शहरातील दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्यापारी नरेश म्हणाले, "सर्व प्रकारच्या साबणींवरील जीएसटी कमी झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. तुपाचे सर्व ब्रँड आणि प्रीमिक्स साहित्यावर असलेला जीएसटी देखील मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. आमची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की, सरकारने जीएसटी कमी करावा. ती आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो."
advertisement
कपड्यांचे व्यापारी असलेले भावेश जोशी म्हणाले, "आता कपड्यांवर फक्त 5 टक्के जीएसटी लागणार आहे. ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. व्यापाऱ्यांना काहीअंशी नुकसान होईल. पण, जीएसटी कमी झाल्याने ग्राहक संख्या वाढेल. त्यामुळे कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना जास्त काही फरक पडलेला नाही."
advertisement
औषधांच्या जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांच्या औषधांवर जीएसटी शून्य टक्के करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूं आणि गाड्यांवरती असलेल्या जीएसटीमध्ये देखील घट करण्यात आली आहे.
असे आहेत जीएसटीतील बदल
खाद्यपदार्थ: तूप, पनीर, बटर, नमकीन, जॅम, ड्राय फ्रुट्स, कॉफी आणि आइस्क्रीमवरील जीएसटीमध्ये कपात करण्यात आली आहे. अन्नपदार्थांवर आता फक्त 5 टक्के जीएसटी लागू होणार आहे. याआधी तो 12 ते 18 टक्के होता.
advertisement
औषधं: ग्लूकोमीटर, डायग्नोस्टिक किट्स तसेच अनेक औषधांवर फक्त 5 टक्के जीएसटी लागणार आहे. सरकारने मेडिकल स्टोअर्संना औषधांच्या किंमती कमी करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
बांधकाम साहित्य: सीमेंटवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आला आहे. यामध्ये 10 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन: टीव्ही, एसी, वॉशिंग मशीनच्या किंमतीवरील टॅक्स कमी करण्यात आला आहे. आता यावर फक्त 18 टक्के जीएसटी लागणार आहे. हा जीएसटी आधी 28 टक्के होता.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 22, 2025 4:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
GST 2.0: नवरात्रीच्या मुहूर्तावर जीएसटी 2.0, कोणत्या जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त?