सांगली : आपल्याकडे पेरू उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक शेतकरी एक्सपोर्ट होणारा तैवान आणि व्हीएनआर प्रकारचा पेरू पिकवत आहेत. पेरूच्या बागा पाहिल्या तर प्रत्येक फळाला फोम आणि पॉलिथिनने बॅगिंग केल्याचे दिसते. शेतकरी का आणि कसे करतात पेरूला बॅगिंग? याबद्दल सांगलीचे प्रगतशील पेरू उत्पादक शेतकरी उदय पाटील यांनी सांगितलेली महत्त्वाची कारणे आपण पाहणार आहोत.
advertisement
अशी आहेत पेरूला बॅगिंग करण्याची कारणे
पेरूला बॅगिंग करण्याच्या तंत्रज्ञानाचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळमाशी पासून पेरूचे संरक्षण होते. तसेच फोममुळे फळाची दर्जा उत्तम राहतो. यामुळे एक्सपोर्ट होणारा पेरू पिकवता येतो. रोगराई पासून, अलीकडे वाढलेल्या पांढऱ्या माशीच्या धोक्यापासून पेरूचे संरक्षण होते. पेरूला फोमिंग आणि बँगिंग करण्याची योग्य वेळ म्हणजे साधारण लिंबूच्या आकाराएवढा पेरू झाला की फोमिंग आणि बॅगिंग करून घ्यावे.
असे करावे फोमिंग आणि बॅगिंग
साधारण 100 ते 150 ग्रॅमचा म्हणजेच लिंबूच्या आकाराएवढा पेरू झाला की त्याला फोमिंग आणि बॅगिंग करावे. प्रथम पेरूच्या बाजूची दोन पाने काढून घ्यावीत. त्यानंतर फळाला फोम चढवावा. वरून पॉलिथिनची बॅग लावावी. बॅगला पहिली गाठ घट्ट बांधावी. त्यानंतर दुसरी गाठ बांधावी. पेरू लिंबूच्या आकाराचा झाल्यानंतर त्यास फोम आणि बॅगिंग करावे. यामुळे फळमाशी, वटवाघूळ यांच्यापासून फळाचे संरक्षण होते.फळांवर डागही पडत नाहीत, निर्यातीसाठी हा पेरू योग्य ठरतो.
फोमिंग आणि बँगींग हे पेरू उत्पादनातील आधुनिक तंत्र आहे. या तंत्राच्या अचूक वापराने निर्यातक्षम पेरू उत्पादित करता येतोय. फॉर्मिंग आणि बँकिंग हे खर्चिक तंत्र असले तरी याच्या अचूक वापराने पेरू उत्पादकांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत असल्याचे प्रगतशील शेतकरी उदय पाटील यांनी सांगितले.