कोल्हापूर – नवीन दिवस, महिना किंवा वर्ष सुरू होणार म्हटलं की अनेकजण आपलं राशीभविष्य पाहात असतात. आता 2024 हे वर्ष संपून लकवरच 2025 या नवीन वर्षास सुरुवात होत आहे. यंदाचे हे नवे वर्ष कसे जाईल? याची उत्सुकता प्रत्येकालाच असेल. राशीचक्रातील प्रत्येक राशीनुसार नवं वर्ष कसं जाईल? हे आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेत आहोत. तूळ ही राशीचक्रातील सातवी रास आहे. या राशीसाठी व्यवसायिक आर्थिक आणि आरोग्य स्थिती येणाऱ्या नववर्षात कसं असणार हे कोल्हापूर येथील ज्योतिष शास्त्री राहुल कदम यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
तूळ राशीची स्वभाववैशिष्ट्ये..
तुळ राशी ही राशीचक्रातील सातवी रास असून जन्म कुंडलीत सात या अंकाने दर्शवली जाते. आकाशामध्ये तराजूच्या आकारात ही रास दिसून येते. त्यामुळे या राशीचे चिन्ह तराजू दाखवले आहे. तराजू हे समानतेचे व न्यायाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे तूळ राशीच्या व्यक्ती देखील समतोल साधणाऱ्या व न्यायाची आवड असणाऱ्या असतात. या राशीचा स्वामी शुक्र हा विलासी व रंगेल ग्रह असून ही रास चरसभावाची व वायू तत्वाची आहे. शुक्राचा विलासीपणा व रंगेलपणा या राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतो, असं ज्योतिषी सांगतात.
तूळ राशीच्या लोकांमध्ये नीटनेटकेपणा छान छोकीपणा तसेच टापटीपपणा व स्वतःकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती यांच्यामध्ये असते. चर स्वभाव असल्याकारणाने एका जागेवरती स्थिर राहत नाहीत. पर्यटनाची व प्रवासाची यांना आवड असते. त्यामुळे हे लोक नेहमी प्रवास करीत असतात. स्थिर राहणे किंवा स्थिर गोष्टी यांना फारशा रुचत नाहीत. आयुष्यात नेहमी बदल अपेक्षित असतो. एकसूरीपणा आवडत नाही. त्यामुळे नवनवीन गोष्टी करत राहणे यांना आवडते.
वायू तत्त्वाची रास असल्याकारणाने तूळ ही बौद्धिक राशी आहे. या राशीचे लोक व्यवहार चतुर व आकर्षक बोलण्याने समोरच्या व्यक्ती वरती छाप पाडतात. यांचा मित्रपरिवार मोठा असतो, तसेच समाजातील उच्चभ्रू व प्रतिष्ठित लोकांमध्ये यांची उठवस असते. आपल्या दिसण्याने समोरच्यावर प्रभाव पाडतात. या व्यक्ती कलासक्त असून कलाक्षेत्रात यांचा वावर बऱ्यापैकी असतो. तसेच विविध कला देखील यांच्या अंगी असतात.
ग्रहमान बदलाचा काय परिणाम?
आगामी वर्षाचा आरंभ हा या राशीसाठी शुभकारक आहे. मात्र 29 मार्च नंतर होणारा शनीचा मीन राशीतील प्रवेश हा आरोग्याच्या विषयी चिंता वाढवणारा असून सांध्याशी व रक्तदाबाशी संबंधित विकार डोके वर काढतील. त्यामुळे याबाबतीत योग्य ती काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा त्रास होत राहील. तिथले वातावरण समाधानकारक राहणार नाही. मार्चनंतरचा काळ हा विनाकारणाचे प्रवास व खर्च वाढवणारा असेल. जर आपण लिखाणाशी संबंधित क्षेत्रात काम करीत असाल, तर लेखन करताना काळजी बाळगावी. आपल्या लिखाणामुळे आपणास मनस्ताप होण्याची दाट शक्यता आहे. लिखाण करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. एखादा मजकूर आपला तणाव वाढवू शकतो. जर आपणास आपल्या नोकरी किंवा व्यवसायात बदल करायचा असेल तर तो बदल मार्च महिन्यापूर्वी करावा.
गुरु बदलानंतर फायदा
शनि देवानंतर जो ग्रह बदल होत आहे तो गुरुचा असून वर्षारंभी अनिष्ट असणारा गुरु 14 मे नंतर आपल्याला शुभकारक होत आहे. 14 मे ला गुरु वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करीत असून तो आपल्या राशीला नववा येत आहे. त्यामुळे आपण जे कराल ते उलटे होत असल्याचा जो आपणास अनुभव येतोय, तो गुरु बदलानंतर येणार नाही. गोष्टी आपल्या मनाजोग्या घडायला सुरुवात होईल. शनीच्या अशुभ प्रभावाला गुरुचा बदल अडथळे निर्माण करेल. त्यामुळे आपल्या जीवनातील वातावरण थोडे हलकेफुलके होईल.
उत्पन्नात वाढ होईल
ज्या व्यक्तींचा विवाह करायचा आहे किंवा जे लोक संततीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी 14 मे नंतर प्रयत्न करावे, त्यांच्यासाठी ते लाभदायक ठरतील. तसेच काही कारणांनी ज्यांचे परदेश गमन रखडले आहे. कागदपत्रांची अडचण निर्माण झालेली आहे. त्यांच्या अडचणी दूर होऊन परदेशी गमनाची वाट सुकर होईल. गुरु बदलानंतर आपले आपल्या भावंडांशी व शेजाऱ्यांशी असलेली वाद संपुष्टात येतील. तसेच भाग्य साथ देऊन आपल्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रतीची वाढ होईल.
शत्रूंचा त्रास कमी होईल
29 मे पर्यंत राहू आपल्या शत्रूस्थानी असल्यामुळे आपणास आपल्या नोकरी व व्यवसायात गुप्त शत्रूंचा त्रास सहन करावा लागेल. तसेच आर्थिक बाजू लंगडी पडेल व येणी वसूल होणार नाहीत. मात्र 29 मे नंतर होणारा राहुकेतूचा राशी बदल हा आपणास लाभदायक ठरणारा असून थकीत येणे वसूल व्हायला सुरुवात होईल. तसेच कार्यक्षेत्रातील गुप्त शत्रूंचा त्रास कमी होईल, असे ज्योतिषी सांगतात.
प्रेम प्रकरणात फसवणूक
प्रेम प्रकरणात मात्र गैरसमज व फसवणुकीची शक्यता अधिक राहील. त्यामुळे याबाबतीत कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. कोणताही निष्कर्ष चटकन काढू नये. 29 मे पर्यंतचा काळ हा विद्यार्थ्यांसाठी चांगला असला तरी त्यानंतरचा काळ हा थोडा निराशाजनक राहील. घेत असलेल्या कष्टाला योग्य ते फळ मिळणार नाही. थोडक्यासाठी यश आपणास हुलकावणी देईल. त्यामुळे निराश न होता आपले प्रयत्न व अभ्यास सातत्याने अधिक लक्षपूर्वक करावा.
कोणती उपासना कराल?
तूळ राशीसाठी कुलदेवीची उपासना लाभदायक ठरते. रोज सकाळी आपल्या कुलदेवीचे स्मरण न चुकता करावे. तसेच शुक्रवारी देवीचे दर्शन घेऊन तिळगुळ व फुटाणे वाहावेत. श्री सूक्त सारखी स्तोत्रे रोज पठण केल्यास अधिक फलदायी ठरेल. आपण शुक्रवारी गोरगरिबांना मिठाई दान करावी, असं देखील ज्योतिषी कदम यांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.





