शेगावातील उत्सव - पुण्यतिथी उत्सवाचा सोहळा भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून (भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवसापासून) सुरू होतो आणि भाद्रपद शुद्ध पंचमीपर्यंत विविध कार्यक्रम चालतात. या पाच दिवसांच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यात गणेशयाग, वरुणयाग, भजन, कीर्तन, प्रवचन आणि विविध दिंड्यांचा समावेश असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विशेषतः ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने भजनी दिंड्या या उत्सवात सहभागी होतात. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तीमय होते.
advertisement
नगर परिक्रमा - उत्सवाच्या दिवशी श्रींच्या रजत मुखवट्याची पालखी गज, अश्व, रथ आणि मेणा यांच्यासह संपूर्ण गावातून नगर परिक्रमेसाठी काढली जाते. या उत्सवासाठी शेगावात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. गजानन महाराज हे "गण गण गणात बोते" या मंत्राचा अखंड जप करत असत आणि त्यांचे हे जीवन कार्य महाराष्ट्रासह देशभरात अनेक भक्तांसाठी प्रेरणादायी आहे. शेगाव संस्थानने स्वच्छता, शिस्त आणि उत्तम व्यवस्थापन यासाठी आदर्श घालून दिला आहे.
देवाच्या परिक्रमांचा नियम चुकवू नका! विधीपूर्वक पूजेसाठी या गोष्टी ध्यानात ठेवा
गजानन महाराजांचा जन्म कधी झाला किंवा त्यांचे मूळ नाव काय होते, याबद्दल निश्चित माहिती नाही. माघ वद्य सप्तमी, शके 1800 (23 फेब्रुवारी 1878) या दिवशी ते शेगाव येथे सर्वप्रथम प्रकट झाल्याचे सांगितले जाते. शेगावातील देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते वेचून खाताना बंकटलाल अग्रवाल यांना त्यांचे दर्शन झाले. त्यावेळी त्यांची अवस्था दिगंबर (वस्त्रहीन) होती आणि ते "गण गण गणात बोते" असा अखंड जप करत होते. याच मंत्रामुळे त्यांना 'गजानन महाराज' हे नाव मिळाले.
महाराजांचा शेगावमध्ये 1878 ते 1910 असा सुमारे 32 वर्षांचा कार्यकाळ होता. या काळात त्यांनी अनेक चमत्कार केले आणि लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून दिले. दासगणू महाराज (श्री गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे) यांनी "श्री गजानन विजय" हा प्रासादिक ग्रंथ लिहिला. या ग्रंथात महाराजांच्या अनेक लीला, चमत्कार आणि उपदेशांचे वर्णन आहे. हा ग्रंथ गजानन महाराजांच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचा आधार आहे.
गजानन महाराजांचे जीवन हे एक मोठे गूढच आहे. ते केवळ एक संत नसून एक योगी, ब्रह्मवेत्ते आणि सिद्धपुरुष होते. त्यांच्या "गण गण गणात बोते" या मंत्रात अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत व्यक्त झाला आहे. आजही लाखो भक्त महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे जातात आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)