गणेश चतुर्थी हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानले जाते. या उत्सवाचा मुख्य उद्देश गणपतीची आराधना करून त्याचा आशीर्वाद घेणं आहे, जेणेकरून जीवनातील सर्व अडचणी (विघ्ने) दूर होतील. गणपतीची मूर्ती चुकून भंग झाल्यास काही धार्मिक उपाय केले जातात. अशावेळी घाबरून न जाता, शांतपणे आणि श्रद्धेने योग्य विधी करणे महत्त्वाचे आहे. त्याविषयी जाणून घेऊ.
advertisement
मूर्ती भंग झाल्यास काय करावे?
मूर्तीची क्षमा मागा: सर्वात आधी, गणपतीची क्षमा मागा. ही घटना चुकून घडली आहे, त्यामुळे मनापासून पश्चात्ताप व्यक्त करा आणि पुढील अनर्थ टाळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा.
मूर्ती विसर्जित करा: खंडित झालेल्या मूर्तीची पूजा करणे हिंदू धर्मात योग्य मानले जात नाही. त्यामुळे ती मूर्ती त्याच दिवशी किंवा लवकरात लवकर सन्मानाने विसर्जित करा. विसर्जन करण्यापूर्वी तिला दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.
ती मूर्ती पाण्यात (नदी, तलाव किंवा समुद्रात) उपलब्ध ठिकाणी विसर्जित करू शकता.
नदी किंवा तलाव जवळ नसेल, तर ती मूर्ती घरातच एका स्वच्छ भांड्यात किंवा बादलीत पाणी घेऊन त्यात विसर्जित करा. मूर्ती पूर्णपणे विरघळल्यावर ते पाणी झाडाला किंवा बागेत टाका.
नवीन मूर्तीची स्थापना: खंडित मूर्ती विसर्जित केल्यानंतर लगेचच नवीन मूर्ती आणा आणि तिची पुन्हा स्थापना करा. नवीन मूर्तीची स्थापना करतानाही तीच विधिवत पूजा आणि मंत्रोच्चार करावे. त्यानंतर शक्य असल्यास कोणत्याही गणेश मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि गणपतीची पूजा करा.
अशा परिस्थितीत दानधर्म करणे शुभ मानले जाते. तुम्ही गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करू शकता. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि विघ्नांवर मात करण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल. धार्मिक मान्यतेनुसार, अशा घटनांमागे कोणतेही अपशकुन नसतो, तर ती एक परीक्षा मानली जाते. त्यामुळे घाबरून न जाता श्रद्धेने आणि शांतपणे वरील उपाय करणे महत्त्वाचे आहे.
घरात पूजेसाठी गणेश मूर्ती खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)