वर्ष 2025 मध्ये परिवर्तिनी एकादशी बुधवार, 3 सप्टेंबर 2025 रोजी आहे. एकादशी तिथीची सुरुवात: 3 सप्टेंबर 2025, पहाटे 03:53 वाजता आणि एकादशी तिथीची समाप्ती: 4 सप्टेंबर 2025, पहाटे 04:21 वाजता. उदय तिथीनुसार, परिवर्तिनी एकादशीचे व्रत 3 सप्टेंबर रोजी केले जाईल.
परिवर्तिनी एकादशीचे धार्मिक महत्त्व:
या एकादशीला 'परिवर्तिनी' हे नाव पडले कारण चातुर्मासात योगनिद्रेत असलेले भगवान विष्णू या दिवशी एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळतात, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी विधीपूर्वक उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार घेतला होता, म्हणून या एकादशीला वामन एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि मंत्र जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
advertisement
एकादशीची पूजा विधी:
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे घालावे. मी आज परिवर्तिनी एकादशीचे व्रत करत आहे, असा संकल्प करावा. एका लाकडी पाटावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. त्यांना फुलं, फळं, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे.
पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा, कारण तुळस भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. मात्र, एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये किंवा तिची पाने तोडू नयेत. एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करू नये. फलाहार किंवा सात्विक आहार घ्यावा. दुसऱ्या दिवशी (द्वादशीला) पारण करावे, म्हणजेच उपवास सोडावा.
उपवास सोडण्याची वेळ:
परिवर्तिनी एकादशीचा उपवास 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारच्या वेळेत सोडू शकता. या दिवशी दुपारी 01:36 ते 04:07 या वेळेत पारण करणे शुभ मानले जाते. एकादशीच्या व्रताने केवळ धार्मिक लाभच मिळत नाही, तर आरोग्यासाठीही ते फायदेशीर असते.
फोनवरून फक्त आश्वासनंच मिळतात? तुमच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक हा असेल
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)