गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात किंवा त्याची उत्त्पती कशी झाली - ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितले गेले आहे. त्यामुळे जगाचा वाढदिवस गुढ्या उभारून या दिवशी साजरा केला जातो. दुसरं म्हणजे
पैठणच्या शालिवाहन राजाने अत्याचारी शकलोकांचा पराभव करून त्यांच्या जाचापासून जनतेची मुक्तता केली आणि त्या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला. हा नूतन वर्षारंभाचा दिवस लोक गुढ्या उभारून साजरा करू लागले. आणि तिसरी गोष्ट भगवान श्रीविष्णूनी प्रभू रामचंद्रांचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा नाश केला. त्यानंतर त्यांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेच्याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी अयोध्येतील लोकांनी गुढ्या- तोरणे उभारून त्यांचे भव्य स्वागत केले, त्या दिवसापासून गुढी उभारून चैत्र शुक्ल प्रतिपदेचा हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
advertisement
कठीण काळाची पुन्हा सुरुवात! अतिचारी गुरू ग्रह मार्गी, या 4 राशींना भरपूर त्रास
गुढी पाडव्या दिवशी काय करावे -
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. दरवाजासमोर रांगोळी घालावी. नवीन वस्त्रे परिधान करावीत. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन, ती स्वच्छ करून तिच्या टोकास तांबडे वस्त्र व फुलांची माळ घालून त्यावर एक उपडी लोटी ठेवावी. अशा रितीने तयार केलेली गुढी दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. काही लोक गुढीस बत्ताशांची माळही घालतात. या गुढीस ‘ब्रह्मध्वज‘ असे म्हणतात. गुढीची पूजा करावी. कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा घालून ते मिश्रण चांगले वाटावे. सर्वांनी ते थोडे थोडे खावे. वर्षारंभी कडूनिंबाचे सेवन केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते. त्यानंतर नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून त्यातील वर्षफळ वाचावे. गोड पदार्थांचे भोजन करून हा नूतन वर्षाचा प्रारंभ दिवस उत्साहाने साजरा करावा. सूर्यास्तापूर्वी गुढीला नमस्कार करून ती खाली उतरावी. या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याचीही प्रथा आहे. शुभकार्याचा प्रारंभ करावा असेही सांगण्यात आले आहे.
