नवीन कर रचनेनुसार, इलेक्ट्रिक गाड्यांना (EVs) पूर्वीप्रमाणेच ५% GST चा फायदा मिळत राहील. मात्र, सर्वात मोठा दिलासा पेट्रोल-डिझेल गाड्या आणि स्ट्रॉन्ग हायब्रीड गाड्यांना मिळाला आहे. आधी कम्बशन इंजिन गाड्यांवर सेससह ४८-५०% कर लागत होता आणि हायब्रीड गाड्यांवर ४३% कर लागत होता. आता या दोन्ही गाड्यांवर समान ४०% GST लागेल.
मर्सिडीजच्या गाड्यांवर किती परिणाम
advertisement
GST च्या नवीन दरांमुळे मर्सिडीजच्या गाड्यांच्या किमती ६-८% पर्यंत कमी होतील. मर्सिडीज-बेंझ इंडिया लवकरच त्यांच्या सर्व गाड्यांसाठी नवीन किंमत यादी जाहीर करणार आहे. हे पाऊल सरकारच्या 'डिकार्बोनायझेशन पॉलिसी' नुसार आहे. आता फक्त दोन श्रेणी असतील: EV किंवा ICE (Internal Combustion Engine). याचा अर्थ हायब्रीड्सना वेगळ्या श्रेणीत ठेवण्याची गुंतागुंत आता संपली आहे, अशी प्रतिक्रिया मर्सिडीज कंपनीकडून देण्यात आली आहे.
डिलर्ससमोर आता जुन्या स्टॉकचं चॅलेंज
या बदलामुळे डीलर्ससमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यांच्याकडे असलेला जुना स्टॉक जास्त कर दराने खरेदी केलेला आहे. यामुळे त्यांना जवळपास २५०० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकतं. अर्थ मंत्रालयाने ही समस्या मान्य केली असून लवकरच यावर तोडगा काढण्याची अपेक्षा आहे.
सणासुदीत विक्री वाढेल
मर्सिडीज-बेंझचा अंदाज आहे की, येणारा सणासुदीचा काळ त्यांच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात चांगला ठरेल. ऑगस्टमध्ये असलेली मागणी, किमतीतील घट आणि ग्राहकांची वाढलेली खरेदी क्षमता यामुळे विक्री नवीन उंची गाठू शकते. मात्र, युरो-रुपया विनिमय दराची कमजोरी भविष्यात अडचणी निर्माण करू शकते. आयात केलेल्या भागांवर याचा थेट परिणाम होईल. याचा अर्थ, सध्या किमती घटतील, पण जर हीच स्थिती राहिली तर येणाऱ्या महिन्यांमध्ये पुन्हा किमती वाढू शकतात.