टेस्ला मोटर्सने सोहना रोडवरील ऑर्किड बिझनेस पार्कमध्ये सुमारे ५१ हजार चौरस फूटचा सुपर बिल्ट-अप क्षेत्र 9 वर्षांसाठी भाड्यानं घेतलं आहे. या ठिकाणी शोरूम, सर्व्हिस सेंटर आणि वेअरहाऊस बांधलं जाणार आहे. रिअल इस्टेट अॅनालिसिस फर्म सीआरई मॅट्रिक्सनं ही माहिती दिली आहे. या जागेचं भाडं सुमारे ४.८२ कोटी रुपये आहे. त्यानुसार, कंपनीला दरमहा यासाठी सुमारे ४० लाख रुपये द्यावे लागणार आहे.
advertisement
टेस्लाने डिपॉझिट रक्कम म्हणून २.४१ कोटी रुपये जमा केले आहेत आणि दर महिन्याचं भाडं हे ७ तारखेपूर्वी द्यावं लागणार आहे. या मालमत्तेत एकूण ५१ पार्किंग जागा उपलब्ध असतील. हा भाडेपट्टा १५ जुलै २०२५ पासून सुरू झाला आणि त्याची नोंदणी २८ जुलै रोजी झाली.
२०.६९ लाख रुपयांची भरली स्टॅम्प ड्युटी
हा करार टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने करण्यात आला. हा करार नऊ वर्षांसाठी आहे. यासाठी कंपनीने २०.६९ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. कागदपत्रांवरून असं दिसून आलंय की या मालमत्तेचं मालकी हक्क तीन पक्षांमध्ये विभागले गेले आहेत. सनसिटी रिअल इस्टेट एलएलपीचा २१%, ऑर्किड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचा ३.०६% आणि गरवाल प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडचा ७५.९४% हिस्सा आहे.
टेस्लाने ऑर्किड बिझनेस पार्क का निवडला?
ऑर्किड बिझनेस पार्कची जागा टेस्लाने धोरणात्मकरित्या निवडलं आहे. ते गुरुग्रामच्या प्रमुख व्यवसाय आणि निवासी क्षेत्रांच्या जवळ आहे. टेस्लाची प्रीमियम इलेक्ट्रिक वाहनं इथं विकली जातील. दिल्ली-एनसीआरमधील लोकांना लक्षात घेऊन हे शोरूम उघडण्यात आले आहे.
एनसीआरमध्ये EV गाड्यांची मोठी मागणी
एनसीआरमधील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वेगाने वाढत आहे आणि टेस्लाच्या प्रवेशामुळे या क्षेत्रात एक नवीन आयाम जोडता येईल. फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (फेम) योजना आणि इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटीमध्ये कपात यासारख्या सरकारी धोरणांमुळे या उद्योगाला चालना मिळाली आहे.