TRENDING:

pandharpur wari special blog: वारी जनातली, जनांच्या मनातली भारुडाचे गारुड(भाग 5)

Last Updated:

माऊलीच्या संजीवन समाधीनंतर साधारण अडीचशे वर्षांनंतर नाथांचा जन्म झाला. नाथांची अन ज्ञानेश्वरांची गाठभेट कशी झाली ? या प्रश्नाचे उत्तर नाथ महाराज स्वत:च देतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संत एकनाथ महाराजांबद्दल बऱ्याच आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यातील सगळ्यात प्रचलित आख्यायिका म्हणजे त्यांना झालेला माऊलींचा दृष्टान्त, माऊलींच्या समाधीला अजान वृक्षाने वेढले आहे आणि त्याची मुळी माऊलींच्या गळ्याभोवती वाढते आहे. नेमका याचा गर्भितार्थ काय असावा ? माऊलीच्या संजीवन समाधीनंतर साधारण अडीचशे वर्षांनंतर नाथांचा जन्म झाला. नाथांची अन ज्ञानेश्वरांची गाठभेट कशी झाली ? या प्रश्नाचे उत्तर नाथ महाराज स्वत:च देतात.
(सुलेखनकार: डॉ तेजस वसंत लोखंडे)
(सुलेखनकार: डॉ तेजस वसंत लोखंडे)
advertisement

श्रीज्ञानदेंवे येवुनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागी ॥१॥

दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा । परब्रम्ह केवळ बोलत असें ॥२॥

अजान वृक्षाची मुळी कंठास लागली । येवुनिं आळंदी स्थळी काढ वेगी ॥३॥

ऐसे स्वप्न होता आलों अलंकापुरी । जव नंदी माझारी देखिंले व्दार ॥४॥

एका जनार्दनी पुर्व पुण्य फळलें । श्री'गुरु भेंटलें ज्ञानेश्वर ॥५॥

advertisement

माऊलींनी स्वप्नात येऊन नाथांना सांगितले माझ्या कंठास अजान वृक्षाच्या मुळीने वेढले आहे. तु येऊन ती दूर कर. अनेकांनी या घटनेचा अर्थ अनेक प्रकारे लावला आहे. सहज मनात उद्भवणारा प्रश्न म्हणजे माऊली ज्ञानेश्वर म्हणजे संजीवन समाधी घेतलेले सामर्थ्यवान महायोगी, त्यांच्या गळ्याशी वेढा घातलेल्या अजान वृक्षाच्या मुळीचा त्यांना त्रास झाला असेल काय ? मग या घटनेचा नेमका काय अर्थ लावायचा ?

advertisement

एकनाथ महाराजांना माऊलींचा दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी चार लोकांना सोबत घेतले. सगळ्यांनी समाधी स्थान शोधण्याचा प्रयत्न केला. सोबतची लोक कंटाळून गेली तरीही नाथांनी प्रयत्न सोडला नाही. शेवटी त्यांना तो नंदी दिसला. नंदी जवळील शिळा दूर करुन त्यांनी समाधीस्थानी प्रवेश केला. तेव्हा त्यांना तेज:पुंज ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन झाले. अन त्यांची माऊलींशी भेट झाली. साक्षात परब्रह्म भेटीचा आनंद झाला. हे पूर्वजन्मीचे पुण्य आहे म्हणून माऊलींची आणि माझी भेट झाली.

advertisement

या सगळ्याचा कार्यकारण भाव लक्षात घेता असेही म्हणता येईल की ‘अजान’ या शब्दाचा अर्थ ‘अज्ञान’ आहे. माऊलींच्या दृष्टांतातील अजान वृक्षाची मुळी म्हणजे समाजात वाढीस लागलेले अज्ञान असावे. त्याकाळी भक्तांना सर्व ग्रंथांचा वारसा हा परंपरेने पाठांतराने प्राप्त होत होता. किंवा त्या काळी ज्या काही प्रती उपलब्ध होत्या त्या साऱ्या हस्तलिखित प्रती होत्या. मूळ प्रतिवरून तयार केलेल्या ज्या प्रती होत्या, त्यामध्ये दुसरी प्रत काढताना निर्माण होणाऱ्या चुका तर होत्याच, पण त्याचबरोबर काही माणसांनी नवीन प्रती बनवताना हेतु पुरस्सर त्यात स्वत:च्या ओव्याही घुसवल्या होत्या. नाथांनी पैठणला आल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रती जमवल्या. त्याचा अभ्यास, संशोधन करुन ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत निर्माण केली.

advertisement

ज्ञानेश्वरीं तर पुर्णतः निःसंशय शुध्दच होती पण पाठांतराच्या ओघात त्यामधे अज्ञानाची अशुध्दी वाढु लागली त्या अशुध्दीची मुळ निवारण्यासाठीच स्वतः ज्ञानेश्वरांनी अजान वृक्षाच्या मुळीचे निमित्तमात्र करुन, गीता-ज्ञानेश्वरीचं शुध्द ज्ञान भक्तांपर्यंत पुन्हा जसेच्या तसें पोहचवण्या करीता, नाथरायांना ज्ञानेश्वरींची स्वतःजवळील प्रती शुध्द करण्यासाठी योग्य समजलें होतें. हा त्या स्वप्नाचा खरा अर्थ अपेक्षित घ्यायला हवा. अडीच शतकांच्या ज्ञानेश्वरोत्तर कालखंडात संतसाहित्याची परंपरा खंडित व विस्कळित झाली होती. एकनाथांनी त्या पूर्वपरंपरेचे भान ठेवून वाङ्मयनिर्मिती केली, म्हणूनच ती परंपरा अखंड, एकात्म व प्रगमनशील राखण्याचे कार्य ते यशस्वीपणे करू शकले.

नाथांनी आपल्या भारुडात अनेक रुपके वापरली आहेत. ‘पाखरु’ हे रुपक वापरुन कूट भारुडाच्या अंगाने जाणारे हे भारुड निर्गुण परमात्म्याच्या रुपाचे दर्शन दाखवून जाते.

कृष्णा एक पाखरूं आहे | तें मुखाविण चारा खायरे |

डोळे नाहीं परि तें पाहे | वाचेविण स्वयें गाये रे ||१||

सख्या त्याचं नांव कान्होबा | कृष्ण म्हणती सर्व रे |

त्याचे वास्तव्य कोठें आहे | पर नाही परि तें उडे रे ||२||

तिहीं लोकीं हिंडते | त्रिभुवन त्याला थोडे रे ||३||

त्याचे नखांत आकाश बुडे | तू सन्मुख चहू कडे रे ||४||

अहो त्याला मायबाप दोन्हीं नाहीं रे | एकपणे विण पहती जनार्दनाचे पायीं रे ||५||

नाथांच्या रचनातून त्यांच्या शब्दवैभवाचे सुरेख आकलन होते. नाथांनी आपल्या या अभंगात सर्वव्यापी परमात्म्याच्या सगुण व निर्गुण रूपाचे फारच गंमतीशीर वर्णन केलेले आहे. या अभंगातून देवाचा आणि भक्ताचा प्रेमाने चाललेला विनोदी संवाद दिसून येतो. आपल्या भक्तांशी संवाद करण्यास देवाला नेहमीच आनंद होत असतो. पेंद्या आणि श्रीकृष्ण गाई घेऊन वनात चालले असताना एकमेकांना निरनिराळी कोंडी विचारत आहेत. पेंद्याला अचानक आठवलेल्या एका कोड्याने तो श्रीकृष्णास पेचात पकडण्याचा प्रयत्न करीत आहे असे दिसते.

कृष्णा एक पाखरूं आहे | तें मुखाविण चारा खायरे |

डोळे नाहीं परि तें पाहे | वाचेविण स्वयें गाये रे ||१||

गाई चारत असताना पेंद्या कृष्णाचे प्रश्न विचारतो. ‘कृष्णा, असे एक पाखरू आहे, त्याला चोच नसतानाही चारा खातो, डोळे नसताना पहातो, वाचा नसताना गातो, मग सांग हे पाखरू कोणते ?’ भक्तांशी संपर्कात असताना भक्ताचे कौतुक करताना देव नेहमीच संतुष्ट होत असतो. आपल्या वागण्या बोलण्यातून भक्तांना आनंद द्यायला त्याला खुप आवडते. पेंद्याची फिरकी घ्यायची या उद्देशाने, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ठाऊक नाही असे दाखवत, कृष्ण पेंद्यालाच सांगतो, तूच सांग रे पेंदया, हे पाखरू कोणते ?

सख्या त्याचं नांव कान्होबा | कृष्ण म्हणती सर्व रे |

त्याचे वास्तव्य कोठें आहे | पर नाही परि तें उडे रे ||२||

आपण विचारलेल्या या कोड्याचे उत्तर कृष्णाला आले नाही याचा आनंद पेंद्याला झाला. साक्षात भगवंताला आपण पेचात पकडले याचा त्याला परमानंद झाला. ‘अरे, एवढ सोपे उत्तर तुला ठाऊक नाही ? हे पाखरू म्हणजे कान्होबा, हे ही तुला कळू नये ? ‘बरं, आता मला सांग, पंख नसताना उडू शकणारे हे पाखरू कुठे राहतो हे तरी तुला माहिती आहे का?’

तिहीं लोकीं हिंडते | त्रिभुवन त्याला थोडे रे ||३||

या अभंगात निर्गुण निराकार ईश्वराचे वर्णन आहे. या निर्गुण रुपातूनच या विश्वाची निर्मिती झाली आहे. परमात्मा चैतन्य रूपाने नटलेला असल्यामुळे तो कोणतेही रूप धारण करू शकतो. त्याला रूप नसल्यामुळे तो मुख विरहित आहे, त्याच्या भक्तांच्या प्रेमाचे अन्न त्याला मिळते. अशी एकही जागा नाही ज्यात तो नाही त्यामुळे हे विश्व पाहण्यासाठी त्याला नेत्रांची आवश्यकताच नाही. सर्व चराचरामध्ये तो भरून असल्यामुळे सर्व ठिकाणी सर्वत्र व्यापक स्वरूपात भरून राहिलेला आहे. त्यामुळे त्यास सर्वत्र मुक्त संचार आहे. कोणत्याही पंखाची गरज नाही.

त्याचे नखांत आकाश बुडे | तू सन्मुख चहू कडे रे ||४||

तो परमात्मा चैतन्य रूपाने नटलेला आहे. त्याचे रूप एवढे विराट आहे की त्याच्यासमोर संपूर्ण विश्व खुजे वाटावे. चैतन्यावरच हे तिन्ही लोक उभे आहेत, न्हवे तर तो त्रिभुवनपलीकडेही भरून राहिलेला आहे. नामदेव महाराजांनी म्हटलेच आहे..

रिता नाही कोठे ठाव | जिकडे पाहावे तिकडे देव ||

एवढेच नाही तर त्याच्या या विराट रूपामध्ये त्याच्या नखात आकाश सामावू शकते. इतका तो व्यापक आहे. तो सर्वत्र भरून राहिलेला आहे.

अहो त्याला मायबाप दोन्हीं नाहीं रे | एकपणे विण पहती जनार्दनाचे पायीं रे ||५||

निर्गुण परमेश्वर स्वयंभू असल्यामुळे त्याला उत्पन्न करणारा कोणी नाही, त्याला मायबापाची गरजच नाही. या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती त्याच्यापासून आहे, असा तो एकमेव आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यालाच मोठ्या प्रेमाने सगुण निर्गुण एकु गोविंदु रे |

मला अशा या एकतत्त्वाची जाणीव करुन देणारे माझे गुरु जनार्दन स्वामी आहेत. म्हणूनच मी जनार्दन रुपी परमात्म्याच्या पायाजवळ राहतो.

लेखक, संकलक: डॉ नरेंद्र भिकाजी कदम

मराठी बातम्या/Blog/
pandharpur wari special blog: वारी जनातली, जनांच्या मनातली भारुडाचे गारुड(भाग 5)
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल