नाशिक : मिसळ खावी तर नाशिकची, असं म्हणतात ते काही उगीच नाही. नाशकात एकापेक्षा एक चवीच्या जबरदस्त मिसळ मिळतात. विशेष म्हणजे केवळ लाल नाही, तर काळ्या मसाल्यातली मिसळ खायलाही खवय्ये इथं येतात. नाशिकची मिसळ अगदी पूर्वजांच्या काळापासून दूरदूरवर ओळखली जाते. ही बाब अचूक लक्षात घेऊन एका 23 वर्षांच्या तरुणानं मिसळीचा व्यवसाय करायचं ठरवलं.
advertisement
हृतिक खोडे असं या व्यावसायिकाचं नाव. ग्रॅज्युएशननंतर त्यानं एका खासगी कंपनीत नोकरी केली. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी तो नोकरी करत होता. परंतु त्यात त्याला हवा तसा पगारही मिळत नव्हता आणि नोकरीत त्याचं मनही रमलं नाही. अखेर त्यानं स्वत:चं असं काहीतरी काम करायचं ठरवलं. व्यवसाय करायचं ठरलं खरं परंतु नेमकं काय विकायचं हे ठरत नव्हतं. शेवटी नाशिकला ज्या पदार्थाच्या शोधात पर्यटक येतात तोच त्यानं विकायचं ठरवलं आणि 'स्पंदन मिसळ' सुरू केली.
गेल्या 6 महिन्यांपासून हृतिकचा हा व्यवसाय उत्तम सुरू आहे. घरचे व्यवसायासाठी परवानगी देणार नाहीत, म्हणून हृतिकने खासगी कंपनीत काही वर्षे काम केलं. परंतु आता बस्स...मन नाहीच लागत, असं वाटल्यावर त्यानं कटुंबियांना 'मला व्यवसाय करायचाय', असं सांगितलं. मग घरच्यांची परवानगी मिळवून त्यानं हॉटेल सुरू केलं. गंगापूर रोडवरील सोमेश्वर मंदिराजवळ हे स्पंदन मिसळ हॉटेल आहे. इथं लाल नाही, तर काळ्या रश्यातली मिसळ मिळते. त्यामुळे खवय्यांची या ठिकाणाला विशेष पसंती असते. इथल्या मिसळची किंमत आहे 85 रुपये. विशेष म्हणजे हृतिक स्वत: ही मिसळ बनवतो.
नाशिकमध्ये खास मिसळ खायला दूरदूरहून खवय्ये येतात. त्यामुळे या व्यवसायातून आज हृतिकची उलाढाल आहे तब्बल 4 ते 5 लाख रुपयांची. दरम्यान, व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मेहनत महत्त्वाची असतेच, परंतु नेमका कोणता व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो याची योग्य निवडही अतिशय महत्त्वाची ठरते.