विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जाताना आपलं हॉल तिकीट अजिबात विसरू नये. महत्त्वाचं म्हणजे आता हॉल तिकिटासोबतच आपल्या महाविद्यालयाचं ओळखपत्र सोबत ठेवणंही अनिवार्य आहे. तसंच विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना पाण्याची बाटली, पेन आणि इतर महत्त्वाचं साहित्य आवर्जून घ्यावं. दरम्यान, प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी तब्बल 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे. यंदा परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुलं आणि 6 लाख 94 हजार 652 मुलींचा समावेश आहे. राज्यातील 3 हजार 373 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचं लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असेल.
दरम्यान, यंदा वाणिज्य शाखेचे सर्वाधिक 1 लाख 66 हजार 429 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्याखालोखाल विज्ञान शाखेचे 1 लाख 27 हजार 704 विद्यार्थी आणि कला शाखेचे 47 हजार 879 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. मुंबईतून 1 लाख 26 हजार 630 विद्यार्थी परीक्षेला बसले असून ठाणे जिल्ह्यातून 1 लाख 15 हजार 484, रायगडमधून 35 हजार 987 आणि पालघर जिल्ह्यातून 63 हजार 220 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
