जवळपास सर्व सरकारी परीक्षांमध्ये विजय अपयशी ठरला होता; मात्र सरतेशेवटी तो यूपीएससी अर्थात देशातली सर्वांत कठीण परीक्षा उत्तीर्ण झाला. आधीच्या अपयशांनी त्याच्या पुढे जाण्याच्या जिद्दीमध्ये अडथळे निर्माण केले नाहीत. उलट, तो आपल्या उद्दिष्टाप्रति अधिक कष्ट घेऊन वाटचाल करू लागला. स्वतःच्या क्षमता ओळखून घेऊन त्याने चिकाटीने केलेल्या प्रयत्नांतून त्याला हे यश मिळालं. आता तो आयएएस अधिकारी आहे. 'डीएनए'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
advertisement
आयएएस अधिकारी विजय वर्धन हे मूळचे हरियाणाचे. सिरसा इथे त्यांचा जन्म झाला. हिस्सारमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग केलं. अनेकांनी पाहिलेलं असतं, तसं सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांनीही पाहिलेलं होतं. त्यामुळे ते यूपीएससी अर्थात नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीत गेले. ते वेगवेगळ्या प्रकारच्या 35 स्पर्धा परीक्षांमध्ये अयशस्वी ठरले. तरीही ते प्रयत्न करत राहिले आणि पुढच्या परीक्षा देत राहिले. त्यांनी आशा कधीच सोडली नाही.
अखेर 2018मध्ये विजय वर्धन यांना पहिलं यश मिळालं. यूपीएससी परीक्षेत त्यांनी 104वा क्रमांक प्राप्त केला. ते आयपीएस अधिकारी बनले; मात्र त्या रिझल्टबद्दलही ते समाधानी नव्हते. त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर 2021 साली त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवलं. आता ते आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 'कायम स्वतःवर विश्वास ठेवा,' असा सल्ला विजय वर्धन यांनी तरुणांना दिला आहे.