नलिन 2019च्या नीट परीक्षेत टॉपर ठरला. त्यानंतर त्याला नवी दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. ही संस्था देशातल्या सर्वोत्तम वैद्यकीय शिक्षणसंस्थांपैकी एक समजली जाते. नलिनने त्या संस्थेत शिक्षण घेतलं असून, तो पदवी मिळण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. सध्या तो मेडिकल इंटर्न म्हणून कार्यरत आहे. लवकरच तो आपलं डॉक्टर होण्याचं उद्दिष्ट पूर्ण करील.
advertisement
नलिनचं प्राथमिक शिक्षण विद्या भारती स्कूलमध्ये, तर माध्यमिक शिक्षण सीकरमधल्या सेंट मेरीज सीनिअर सेकंडरी स्कूलमध्ये झालं. 11वी आणि 12वीचं शिक्षण त्याने प्रिन्स अकॅडमीत घेतलं. शाळेत तो अभ्यासात हुशार होताच; पण इतर अॅक्टिव्हिटीजमध्येही तो सहभागी होई. स्केटिंग, क्रिकेट, प्रश्नमंजूषा, स्कूल परेड्स, टेबल टेनिस, वादविवाद स्पर्धा, अभिनय आणि संगीत अशा अनेक गोष्टींमध्ये त्याने सहभाग घेतला. त्याला दहावीत 92 टक्के, तर बारावीत (सीबीएसई) 95.8 टक्के मार्क्स मिळाले.
नलिनला वैद्यकीय पार्श्वभूमी आहे. 2019च्या माहितीनुसार, त्याचे वडील डॉ. राकेश खंडेलवाल सीकरमधधल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते, तर आई डॉ. वनिता खंडेलवाल गायनॅकॉलॉजिस्ट होती. नलिनचा मोठा भाऊ तेव्हा जोधपूरच्या एसएनएमसी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत होता.
नलिनने अभ्यास कसा केला?
नलिनचे मार्क्स हे त्याच्या कठोर कष्टांचं फळ आहे. तो दर दिवशी 12 ते 13 तास अभ्यास करायचा. अॅलन करिअर इन्स्टिट्यूटच्या जयपूर सेंटरमध्ये तो सहा तास कोचिंग क्लासला जायचा आणि सहा तास सेल्फ स्टडी करायचा. नीट परीक्षेत टॉपर ठरल्यानंतर दिलेल्या इंटरव्ह्यूजमध्ये त्याने आपल्या अभ्यासाबद्दल सांगितलं. त्याने सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे टाळला होता. त्याच्याकडे स्मार्टफोनही नव्हता. त्यामुळे त्याचं लक्ष विचलित झालं नाही. एनसीईआरटीच्या पुस्तकांचं अनेकदा वाचन आणि 'नीट'च्या आधीच्या पेपर्सचं विश्लेषण यांमुळे प्रश्नांचा पॅटर्न लक्षात आल्याचं त्याने सांगितलं होतं.