सातवीपर्यंत शिक्षण; जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण थांबले
वंदना मोहिते यांचे बालपण रत्नागिरी जिल्ह्यात गेले. त्यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत झाले. मात्र त्यांच्या पाठोपाठ सहा बहिणी असल्यामुळे आणि घरची आर्थिक परिस्थिती साधी असल्यामुळे लहानपणापासूनच घरकाम आणि कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. यानंतर त्यांचे लग्न झाले आणि त्या मुंबईत स्थायिक झाल्या. संसार, मुलांचे संगोपन आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळताना स्वतःचे शिक्षण मागे पडले.
advertisement
शेतकऱ्याचा लेक झाला अधिकारी, क्लासेसचा आधार न घेता मिळवलं यश, UPSC परीक्षेत 434 रँक, Video
मुलांच्या प्रोत्साहनामुळे पुन्हा अभ्यासाला सुरुवात
आज वंदना मोहिते यांची तिन्ही मुले उच्चशिक्षित आहेत. मोठा मुलगा इंजिनिअर आहे, तर मधली मुलगी आणि धाकटा मुलगा या दोघांनीही मास्टर्सपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. मुलांनी आईला पुन्हा शिक्षण घ्यावे, असे प्रोत्साहन दिल्यानंतर वंदना मोहिते यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बाहेरून 17 नंबरचा फॉर्म भरून दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली.
मुलीच्या लग्नाच्या तयारीतही अभ्यास कायम
फॉर्म भरल्यानंतर त्यांच्या मुलीचे लग्नही ठरले. साखरपुडा आणि लग्नाच्या तयारीमुळे घरात मोठी धावपळ सुरू होती. तरीही या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. कल्याणमधील जवळच्या शाळेत जाऊन त्यांनी फॉर्म भरला आणि तेथील क्लासमध्ये जवळपास दोन महिने शिकायलाही गेल्या. गृहपाठ, तोंडी परीक्षा आणि इतर तयारी त्यांनी नियमितपणे पूर्ण केली.
चाळीतील मुलांकडूनही मिळाली मदत
वंदना मोहिते यांना त्यांच्या कुटुंबासोबतच परिसरातील लोकांचाही मोठा पाठिंबा मिळाला. त्या ज्या चाळीत राहतात, तेथील मुलं-मुली त्यांना अभ्यासात मदत करतात, धडे समजावून सांगतात. या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्यांनी दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण केली.
बारावी आणि लॉचे शिक्षण
दहावीची परीक्षा देऊन थांबण्याचा त्यांचा विचार नाही. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण करून पुढे कायद्याचे (लॉ) शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांच्या शाळेत शिकणारे अनेक सहाध्यायी आज पोलिस खात्यात, सरकारी सेवेत किंवा विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पाहून शिक्षणाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. 52 व्या वर्षी पुन्हा एकदा दहावीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेऊन वंदना मोहिते यांनी समाजासमोर प्रेरणेचा एक वेगळा आदर्श ठेवला आहे. त्यांची कहाणी हेच दाखवून देते की शिकण्याची इच्छा आणि जिद्द असेल, तर वय कधीच शिक्षणाच्या आड येत नाही.





