रायपूर: वैयक्तिक वादातील सूड उगवण्यासाठी तब्बल 426 विद्यार्थ्यांचा जीव एका माथेफिरू शिक्षकाने धोक्यात घातला. 'पर्सनल स्कोअर सेटल' करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे.
advertisement
पाकेला येथील पोर्टा केबिन निवासी विद्यालयात तब्बल 426 विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचा प्रकार समोर आला असून, आरोपी शिक्षक धनंजय साहूला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याची ही घटना समोर आल्यानंतर हायकोर्टाने स्वत: या प्रकरणात लक्ष घालत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी एफआयआर नोंदवत तपास सुरू केला.
जुन्या वादातून घडले कृत्य
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले की, आरोपी शिक्षक धनंजय साहू आणि वसतिगृह अधीक्षक दुजल पटेल यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होता. याआधी साहू अधीक्षक पदावर होते, मात्र विद्यार्थ्याला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याने त्यांना पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर दुजल पटेल यांची अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. याच रागातून साहूने बदला घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचे उघड झाले.
प्रशासनाची तातडीने कारवाई
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने कारवाई केली. जिल्हाधिकारी देवेश कुमार ध्रुव यांनी आरोपी शिक्षक साहूला निलंबित केले. तसेच अधीक्षक दुजल पटेल यांनाही पदावरून हटवून त्यांची बदली समग्र शिक्षण विभागात करण्यात आली. सहाय्यक अधीक्षक गौतम कुमार ध्रुव यांचीही बदली करून त्यांना माध्यमिक शाळेत पाठवण्यात आले. त्यांच्या जागी भवनसिंग मंडावी यांची नवी अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
न्यायालयीन कारवाई आणि चिंता
सुकमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रोहित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहूविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणात विष मिसळण्याचा हा प्रकार केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर थेट विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा असल्याने पालक आणि समाजात तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
