हा प्रकार अहमदाबादमधील विराटनगरच्या ओव्हरब्रिजखाली घडला आहे. इथं पार्किंगमध्ये लावलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून उग्र वास येत होता. कारची डिग्गी उघडताच आतमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह आढळला. हिंमत रुदानी असं हत्या झालेल्या बिल्डरचं नाव आहे. फोन कॉल्सच्या डिटेल्सच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. मारेकऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील विराटनगर ओव्हरब्रिजखाली पार्क केलेल्या पांढऱ्या मर्सिडीज कार क्रमांक GJ01KU6420 मधून दुर्गंधी येत होती. त्यानंतर १३ सप्टेंबरच्या रात्री स्थानिक लोकांनी मर्सिडीज कारमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कारची तपासणी केली असता कारच्या डिग्गीत एक मृतदेह आढळला. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता, हा मृतदेह बांधकाम व्यावसायिक हिम्मत रुदानी यांचा असल्याचं समोर आलं.
advertisement
अहमदाबादच्या ओढव पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने बांधकाम व्यावसायिक हिम्मत रुदानी यांची हत्या केली. यानंतर मारेकऱ्याने त्यांचा मृतदेह मर्सिडीज कारच्या डिग्गीत सोडून पळ काढला. रुदानी यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत, त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहेत. मृताचे कॉल डिटेल्स आणि पुलाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले जात आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक हिम्मत रुदानी यांच्या हत्येप्रकरणी राजस्थानमधील सिरोही येथून एका अल्पवयीन मुलासह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.