गप्पा मारत असतानाच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी समाधान गोन्हे हे रात्री घराजवळ शतपावली करत असताना त्यांना त्यांचा मित्र रवी उशिले भेटला. दोघे मित्र गप्पा मारत उभे असतानाच, तिथे संशयित आरोपी संतोष गवळी (30) आणि त्याचा पुतण्या ओम गवळी (19) हे दोघे आले. जुन्या वादाची खुन्नस मनात धरून त्यांनी रवीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
advertisement
चॉपरने सपासप वार अन् लाकडी दांडक्याने प्रहार
वादाचे रूपांतर काही वेळातच रक्तरंजित संघर्षात झाले. संशयित आरोपी ओम गवळी याने आपल्याजवळील धारदार चॉपरने रवीच्या पोटावर, पाठीवर आणि डोक्यावर वर्मी घाव घातले. याचवेळी संतोष गवळी याने लाकडी दांडक्याने रवीला बेदम मारहाण केली. या भीषण हल्ल्यात रवी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांची तत्परता: दीड तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या
घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला. गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या दीड तासांत संशयित काका-पुतण्याला बेड्या ठोकल्या. संशयित संतोष गवळी याच्यावर 2010 मध्ये चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी या घटनेत ई-साक्ष नोंदवली असून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत रवीच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.






