नांदेड जिल्ह्यातील आलुर येथील शेरफुले कुटुंब हातोला येथे कामासाठी आलं होतं. शिलाबाई सुरेश शेरफुले (वय 41) या गेल्या पंधरा वर्षांपासून पती सुरेश शंकर शेरफुले, मुलगा शंकर आणि मुलगी शुभांगी यांच्यासह सालगडी म्हणून काम करत होत्या. सध्या त्या पंढरी बाबुराव शेळके यांच्या शेतात मजुरी करत होत्या. कष्टावर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात अनेक दिवसांपासून संशयाच्या कारणावरून वाद होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
advertisement
चालत्या बसमध्ये पोट दुखायला लागलं, जिनं जागा दिली तिच्यासोबतच भयंकर घडलं, बीडमध्ये खळबळ
23 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी सुरेश शेरफुले याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जाब विचारला. यावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसक भांडणात होऊन आरोपीने घरात असलेल्या काठीने शिलाबाई यांच्या डोक्यावर, कपाळावर, उजव्या कानाजवळ, डोळ्याच्या वरच्या भागावर तसेच पायाच्या नडगीवर जबर मारहाण केली. या मारहाणीत त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडल्या.
पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांना फोन करून पत्नीला अचानक अटॅक आल्याने मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर मृतदेह खाजगी वाहनातून आलुर येथे नेण्यात आला. मात्र मृतदेह पाहिल्यानंतर शरीरावर असलेल्या गंभीर जखमांमुळे नातेवाईकांना संशय आला. त्यांनी आरोपीकडे चौकशी केली असता, चारित्र्याच्या संशयातून आपणच पत्नीची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. याचबरोबर मुलगा शंकर यानेही वडिलांनी आईची हत्या केल्याची माहिती दिली.
यानंतर नातेवाईकांनी तत्काळ डायल 112 वर संपर्क साधला. देगलूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र घटना बर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने संबंधित पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत महिलेचा भाऊ धोंडीबा संभाजी अलमवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश शंकर शेरफुले याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बर्दापूर पोलीस करीत आहेत.






