चालत्या बसमध्ये पोट दुखायला लागलं, जिनं जागा दिली तिच्यासोबतच भयंकर घडलं, बीडमध्ये खळबळ
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: सहानुभूतीपोटी पुनम बडे यांनी महिलेला बसू दिले. मात्र, काही वेळानंतर ती महिला वारंवार तिथेच पाहायला लागली.
बीड: सध्याच्या काळात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. प्रवासादरम्यान तर आपलं सामान लक्षपूर्वक सांभाळावं लागतं. बीडमध्ये चालत्या बसमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रवासी महिलेच्या कपड्यांच्या बॅगेतून मौल्यवान सोन्याचे दागिने लंपास झाले. विशेष म्हणजे पोट दुखत असल्याचे सांगितल्याने जिला जागा दिली तीच हात साफ करून निघून गेली. अडीच लाखांचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा गेवराई पोलिसांत दाखल झाला आहे.
या घटनेतील फिर्यादी पुनम शुभम बडे (रा. जायकवाडी कॅम्प, बागपिंपळगाव, ता. गेवराई) या संक्रांत सणानिमित्त 12 जानेवारी रोजी माहेरी मोठेवाडी (ता. माजलगाव) येथे गेल्या होत्या. सणानंतर 19 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या वडिलांसह माजलगाव बसस्थानकातून गेवराईकडे बसने निघाल्या होत्या. प्रवास सुरळीत सुरू असतानाच गढी परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
advertisement
बसमध्ये प्रवास करत असताना एक अज्ञात महिला पुनम बडे यांच्या जवळ आली. पाठीमागून धक्का लागत असल्याचे कारण देत तिने पोटदुखीचा त्रास असल्याचे सांगितले आणि शेजारी बसण्याची विनंती केली. सहानुभूतीपोटी पुनम बडे यांनी तिला बसू दिले. मात्र, काही वेळानंतर ती महिला वारंवार त्यांच्या कपड्यांच्या बॅगेकडे हात नेत असल्याचे लक्षात आले. संशय आल्याने पुनम बडे यांनी तिला थोडे बाजूला सरकून बसण्यास सांगितले.
advertisement
काही अंतरानंतर सदर अज्ञात महिला मोंढानाका, गेवराई येथे बसमधून उतरून निघून गेली. त्यानंतर गेवराई बसस्थानकात पोहोचल्यानंतर पुनम बडे यांनी आपली बॅग तपासली असता बॅगची चेन उघडी असल्याचे दिसून आले. सखोल तपासणी केली असता बॅगमधील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे एकच खळबळ उडाली.
चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये 2.5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 4 ग्रॅम वजनाचे कानातील फुल तसेच 3 तोळे 5 ग्रॅम वजनाचे साखळीचे गंठण यांचा समावेश असून एकूण ऐवज सुमारे 2 लाख 49 हजार रुपयांचा आहे. या घटनेबाबत पुनम बडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलीस बसमधील प्रवासी, मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी महिलेचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 1:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
चालत्या बसमध्ये पोट दुखायला लागलं, जिनं जागा दिली तिच्यासोबतच भयंकर घडलं, बीडमध्ये खळबळ









