आता झोपडीत नाही, हक्काच्या घरात राहायचं! 10 लाख घरं आणि बरचं काही, मुंबईत गेमचेंजर प्लॅन
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: मुंबईत सुमारे 20 लाख झोपड्यांचा पुनर्विकास करण्यात येणार असून नागरिकांना 10 लाख परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.
मुंबई: राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी मोठ्या पायाभूत आणि गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना महामुंबईसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 20 लाख झोपड्यांचा पुनर्विकास करण्यात येणार असून नागरिकांना 10 लाख परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. शहरात नव्या झोपड्या उभारल्या जाऊ नयेत यासाठी GIS आधारित मॅपिंगचा वापर करून ‘नो न्यू स्लम फ्रेमवर्क’ विकसित करण्यात येणार आहे. ही प्रणाली पुढे इतर शहरांमध्येही लागू करण्याचा विचार आहे.
सागरी सेतूची उभारणी
वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठीही अनेक मोठे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. मुंबई–वाढवण द्रुतगती मार्गाला जोडण्यासाठी उत्तन ते विरार दरम्यान सागरी सेतू उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे 58,754 कोटी रुपये आहे. तसेच अटल सेतूला नवी मुंबई विमानतळाशी जोडणारा उलवे किनारी मार्ग जुलै 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
advertisement
चौथी मुंबई विकासाचा प्लॅन
महामुंबईच्या विस्ताराच्या दृष्टीनेही नवीन शहरे विकसित करण्याचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. अटल सेतू परिसरात ‘तिसरी मुंबई’तर पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर परिसरात ‘चौथी मुंबई’ विकसित करण्याची योजना आहे. या विकासाच्या माध्यमातून 2030 पर्यंत महामुंबईची अर्थव्यवस्था सध्याच्या 140 अब्ज डॉलर वरून 300 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे.
advertisement
भुयारी अन् उन्नत मार्गाला गती
वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी भुयारी मार्ग, उन्नत मार्ग आणि मेट्रो प्रकल्पांनाही गती दिली जात आहे. शिवडी ते वरळी उन्नत मार्ग सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तसेच ऐरोली ते कटाई नाका उन्नत मार्ग 3 चे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबईतील ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्हदरम्यानचा भुयारी मार्ग प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
advertisement
मेट्रोसाठी मोठी तरतूद
याशिवाय अनेक महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांसाठी निधी जाहीर करण्यात आला आहे. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो-11 भूमिगत प्रकल्पासाठी 23,487 कोटी रुपये, मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो-8 साठी 22,862 कोटी रुपये, तर तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रोसाठी 25,575 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच ठाणे–बोरिवली मार्ग, वर्सोवा–भाईंदर मार्ग, स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूआणि पनवेल ते कर्जत उपनगरीय रेल्वे यांसारखे प्रकल्पही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे महामुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 1:49 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
आता झोपडीत नाही, हक्काच्या घरात राहायचं! 10 लाख घरं आणि बरचं काही, मुंबईत गेमचेंजर प्लॅन








