गाझियाबाद थाना क्रॉसिंग रिपब्लिक पोलिसांनी याप्रकरणी महिलेसह दोघांनाही अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांना त्यांच्याकडून सोन्याची चेन, 3200 रुपये आणि एक स्कुटी मिळाली आहे. गाझियाबादच्या अजनारा मार्केटजवळ एका महिलेची चेन ओढून चोरट्यांनी पळ काढला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. घटनास्थळाजवळचे सीसीटीव्हीही तपासण्यात आले, तेव्हा चोरीमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचं समोर आलं.
advertisement
चेन चोरी केलेली ही महिला स्कुटी चालवत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत होतं, त्यानंतर पोलिसांनी आणखी माहिती गोळा करून आरोपींना पकडलं. विवेक पांडे आणि त्याची पत्नी कीर्ती शर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातला विवेक पांडे हा अयोध्येचा रहिवासी आहे. पोलिसांनी या दोघांकडून स्कुटी, चोरलेली चेन आणि 3200 रुपये जप्त केले आहेत.
आम्ही एचडीएफसी बँकेचं क्रेडिट कार्ड विकत घेतलं होतं, पण त्याचे हफ्ते आम्हाला वेळेत भरता येत नव्हते. बँकेकडून वारंवार पैसे देण्यासाठी दबाव टाकला जात होता, त्यामुळे आमच्याकडे चेन चोरी करण्यावाचून पर्याय नव्हता, असं दोन्ही आरोपींनी पोलिसांना सांगितलं आहे. याआधीही आम्ही एका महिलेची चेन चोरली होती, आमची मजबुरी सांगून आम्ही ही चेन रस्त्यातून जाणाऱ्या एका व्यक्तीला विकली होती, असंही या दाम्पत्याने सांगितलं आहे.