हल्द्वानी - गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीने घरमालक व्यापारी आणि त्याच्या पत्नीला सूपमध्ये मादक पदार्थ मिसळवत त्यांना बेशुद्ध केले आणि त्यानंतर चोरी केली. यानंतर सुरक्षारक्षक येईपर्यंत आपल्या दोन साथीदारांसह घटनास्थळावरुन फरार झाली.
advertisement
उत्तराखंडच्या हल्द्वानी शहरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हल्द्वानी येथील प्रतिष्ठित पुस्तक व्यावसायिक पूरन अँड सन्स यांच्या घरी ही घटना घडली. घरात त्यांची मोलकरीण हिने दीपक अग्रवाल आणि त्यांची पत्नी मीनाक्षी यांना सूपमध्ये मादक पदार्थ मिसळला आणि त्यांना बेशुद्ध केले. यानंतर त्यांच्या घरात चोरी केली. तसेच आपल्या दोन साथीदारांसह तेथून पोबारा केला.
सुरक्षारक्षकाने घरात पोहोचल्यावर याबाबतची माहिती नातेवाईकांना दिला. यानंतर दीपक अग्रवाल आणि त्यांची पत्नी मीनाक्षी यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, खूप वेळानंतर हे दाम्पत्य शुद्धीवर आले. 12 नोव्हेंबरला हल्द्वानीचे प्रसिद्ध व्यापारी यांच्या घरी त्यांच्या मुलाचे लग्न झाले. यानंतर त्यांचा मुलगा आपल्या पत्नीसह हनीमूनला गेला होता. त्यानंतर घरी फक्त अग्रवाल दाम्पत्य होते. मोलकरणीला व्यापाऱ्याच्या बहिणीने दिल्लीच्या एका खासगी कंपनीकडून हायर करुन हल्द्वानी येथे पाठवले होते.
मात्र, या मोलकरणीने याठिकाणी आपल्या दोन मित्रांच्या मदतीने व्यापाऱ्याच्या घरी चोरी केली. ज्या खोलीत जास्त दागिने आणि रोख रक्कम होती तेथील लॉकर तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी काय काय चोरी केली आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, पोलिसांनी कपाट तोडण्यासाठी वापरण्यात आलेली हातोडी आणि इतर साहित्य ताब्यात घेतले आहे.
पैशांसाठी बालपणीच्या मित्राने केली फसवणूक, भारतीय इंजीनिअरला अडकवले, नेमकं काय घडलं?
वृद्ध दाम्पत्याला हे प्रकरण मीडियासमोर आणायचे नाही. त्यामुळे त्यांनी अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही. मोलकरीण सध्या फरार आहे. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणाची दखल घेत सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पाळत ठेवून मोलकरणीचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती शहराचे पोलीस अधीक्षक प्रकाश चंद्र यांनी दिली.