शुभम कट्टीमनी असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. घटनेच्या दिवशी २९ तारखेला तो कराडच्या ईदगाह मैदानात आपल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तिथे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून पाच जण आले. त्यांनी गाडीतून उतरताच शिवीगाळ करत शुभमवर हल्ला चढवला. आरोपींनी चाकू आणि कोयत्याने वार केले. तसेच काही जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
advertisement
यामध्ये शुभम कट्टीमनी हा युवक जखमी झाला. या हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या शुभमच्या मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आरोपींनी शुभमला मारहाण करताना जीवे ठार करण्याची देखील धमकी दिली आहे. यामुळे पोलिसांनी आरोपींवर खूनाच्या प्रयत्नासह जीवे मारण्याची धमकी, आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात एक अल्पवयीन मुलासह पाच जणांचा समावेश आहे. कराड शहर पोलीस या प्रकरणात पाचही आरोपींना अटक केली आहे. ईदगाह मैदानात अशाप्रकारे एका तरुणावर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.