शनिवारी मध्यरात्री नक्की काय घडलं?
शनिवारी मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास शिर्डी विमानतळाजवळील एका वस्तीतील घरात घुसून काही अज्ञातांनी घरातील तिघांवर जीवघेणा हल्ला केला होता. हा हल्ला इतका भयंकर होता की यात बापलेकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृत्यू झाला. तर मयताची आई गंभीर जखमी झाल्या. साहेबराव पोपट भोसले (वय वर्षे 60) आणि मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय वर्षे 30) अशी मयतांची नावे असून साखरबाई साहेबराव भोसले या गंभीर जखमी झाल्या. साखरबाई यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह राहता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जलद गतीने तपासाची चक्रे फिरवत सिन्नर पोलिसांच्या मदतीने नाशिक जिल्ह्यातील पळसे टोल नाक्यावर सापळा रचून दोन आरोपींना जेरबंद केले आहे.
या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून दरोड्याच्या उद्देशाने हे हत्याकांड केल्याची माहिती दिली आहे. संदीप रामदास दहाबाड, वय 18 वर्षे आणि जगन काशिनाथ किरकिरे, वय 25 वर्षे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.