हिंगोली : क्षुल्लक कारणावरून व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना हिंगोली शहरात घडली आहे. अकोला रोडवरील एका पेट्रोल पंपावर दोन व्यक्तींनी एका व्यावसायिकावर लाकडी दांडक्याने, खुर्च्यांनी आणि दगडांनी हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना 17 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. काळुराम जाधव असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून ते स्टोन क्रशर मशीन चालवण्याचा व्यवसाय करतात. मिळालेल्या माहितीनुसार, जाधव हे अकोला रोडवरील एका पेट्रोल पंपावर गेले असताना किरकोळ वाद झाला. तो वाद काही वेळातच चिघळला आणि दोघांनी मिळून जाधव यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी प्रथम लाकडी दांड्याने आणि खुर्च्यांनी मारहाण केली, त्यानंतर दगड उचलून व्यावसायिकाच्या अंगावर फेकले. या मारहाणीमध्ये काळुराम जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल
या संपूर्ण प्रकाराचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले असून त्यात आरोपी निर्दयपणे व्यावसायिकाला मारहाण करत असल्याचे दिसते. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर कारवाईची मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच बासंबा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी काळुराम जाधव यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सुरू
या घटनेमुळे हिंगोली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या पेट्रोल पंपासारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारे हल्ला घडल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांची ओळख पटवून पुढील तपास सुरू आहे.
बीडमध्ये देखील राडा
शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी संध्याकाळी दोन तरुणांच्या गटांमध्ये झालेल्या राड्याने परिसरात काहीकाळ गोंधळ उडाला. गाडीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद पेटला आणि त्याचे रूप हाणामारीत बदलले. या घटनेत एक जण जखमी झाला असून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी चौकात दोन गटांतील काही तरुणांमध्ये गाडीला कट लागल्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच वाद वाढत गेला आणि दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर हल्ला चढवला. या झटापटीत एक तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.