कोइलवार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या सुरौंधा कॉलनी गावातील आरोपी आदित्य याने स्वतः च्या अडीच वर्षांच्या निष्पाप मुलीच्या रडण्याला वैतागून तिला बेदम मारहाण करून तिची हत्या केली. बुधवारी ही घटना घडली असून गुरुवारी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार यादव यांनी घटनेला दुजोरा दिला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
advertisement
मृत अनुष्का ही चार बहिणी आणि एका भावात सर्वात धाकटी होती. तिच्या पश्चात आई रेश्मी देवी, बहीण संध्या कुमारी, अनु कुमारी, स्नेहा कुमारी आणि भाऊ प्रकाश कुमार असा परिवार आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मृत मुलीचे आजोबा पारस महतो यांनी सांगितलं की, 'मृत मुलीचे वडील आरोपी आदित्य व्यसनाच्या आहारी गेले होते. तिची आई रेश्मी एका दुकानात काम करते. बुधवारी रेश्मी नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. दरम्यान, आदित्य हा दारूच्या नशेत घरी आला. तेव्हा अनुष्का रडत होती. यामुळे संतापलेल्या आदित्य याने अनुष्काला गच्चीवर नेऊन मारहाण केली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. बुधवारी रात्री आठच्या सुमारास तिची आई घरी परतली असता इतर मुलांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर आईने मेडिकल स्टोअरमधून औषध विकत घेऊन अनुष्काला दिले. ती गुरुवारी डॉक्टरांकडे जखमी मुलीला घेऊन जाणार होती. पण गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मुलीचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वाचा - एक-एक करून कुटुंबातील लोक झाली गायब, 3 दिवसांनी सापडले आई आणि 2 मुलांचे मृतदेह
दरम्यान, या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मृत मुलीच्या कुटुंबियांना या प्रकाराचा जोरदार धक्का बसलाय.
