नाव बदलून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
मोहम्मद उजैर आलम असं गुन्हा दाखल झालेल्या ३७ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. त्याने आपलं नाव राजू असल्याचं सांगत एका तरुणीला २०१३ मध्ये नाशिकला आणलं होतं. दोघंही इथं श्रमिकनगरमध्ये वास्तव्याला होते. मी अनाथ असून माझं कुणी नाही. मी कोणत्या धर्माचा आहे, हेही माहीत नाही, असं सांगून आरोपीनं तरुणीला जाळ्यात अडकवलं. तिला लग्नाचं आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक सबंध ठेवले.
advertisement
धर्मांतरासाठी दबाव, बुरख्याची सक्ती
यातून पीडित तरुणी २०१६ मध्ये गर्भवती झाली. यानंतर तिला आरोपी मुस्लीम असल्याचं आणि त्याला भाऊ, आई असल्याचं समजलं. मात्र आता आपण घरी परत जाऊ शकत नसल्यामुळे पीडितेनं आरोपीसोबत राहून अन्याय अत्याचार सहन केला. दरम्यानच्या काळात तिने एका मुलीलाही जन्म दिला. युवकाच्या धर्माची ओळख पटल्यानंतर त्याने युवतीला हिंदू धर्माप्रमाणे घरात पूजा करण्यास विरोध केला. तसेच घराबाहेर जाताना बुरखा घाल, असं सांगून युवतीला मारझोड केली. तसेच तिला घरातून काढून देण्याची धमकी देखील दिली.
या घटनेची माहिती काही स्थानिक युवकांना मिळाल्यानंतर त्यांनी युवतीला धीर देत सातपूर पोलीस ठाण्यात नेलं. याठिकाणी पोलिसांनी युवतीच्या फिर्यादीवरून आरोपी युवकाविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अद्याप अटक केली नाही. घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत.
अंबडमध्येही कथित लव्ह जिहाद
नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अशीच एक घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने धर्मांतर कर, नाहीतर तुझ्यासह मुलांना जीवे मारेल, अशी धमकी देत एकाने पत्नीचा छळ केला. तसेच आई-वडिलांची प्रॉपर्टी नावावर करण्याचा तगादा लावून कुटुंबियांना ठार मारण्याची धमकीही दिल्याची तक्रार विवाहितेने दिली. पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने चांगली वागणूक देत असल्याचे भासवून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर संशयित पती आणि तिच्या सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या वडिलांकडून वेळोवेळी एकूण ६ लाख रुपये घेतले. फिर्यादी पहिल्यांदा गरोदर राहिल्यावर, मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती करून अत्याचार केले. प्रसूतीनंतर विवाहितेने मुलीचे हिंदू नाव ठेवले. तसेच धर्मांतरास प्रतिसाद न दिल्याने तिच्या पतीने सारडा सर्कल येथे तिचा रस्ता अडवून चॉपर दाखवून आई-वडिलांची प्रॉपर्टी नावावर करून देण्यास, धर्मांतर करण्यास सांगितले. असं केलं नाहीतर जिवे ठार मारेन, अशी धमकी दिली.
गळा दाबला, मारहाण करून जमीनीवर पाडले
त्यानंतरही विवाहितेने धर्मांतरास नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपी पतीने विवाहितेस दुसऱ्या वेळी गरोदर असताना मारहाण करून जमिनीवर पाडले. गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. २०१९ ते २०२५ या कालावधीदरम्यान संशयिताने विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्याकडील पैसेही उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सुरू आहे.