ऑनलाईन मैत्रीच्या नावाखाली पुरुषांना भेटून त्यांना गुंगीच्या गोळ्या देऊन त्यांची लूटमार (Robbery) करणाऱ्या दोन तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. हा केवळ चोरीचा प्रकार नसून, ऑनलाइन जगात आपण किती सावध असायला हवे, हे दाखवून देणारी घटना आहे.
नेमकं काय घडलं? 'लव्ह ट्रॅप' आणि लूटमार
पालघरमधील मांडवी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या या दोन तरुणींची काम करण्याची पद्धत अत्यंत धोकादायक होती
advertisement
या दोघी ऑनलाइन डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून पुरुषांशी संपर्क साधायच्या. त्या पीडित व्यक्तींना भेटायच्या आणि त्यांना गुंगीच्या गोळ्या देऊन बेशुद्ध करायच्या. व्यक्ती बेशुद्ध झाल्यावर त्याच्याजवळील दागिने, पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन पसार व्हायच्या. पोलिसांनी या दोघींकडून 4 लाख रुपयांचे चोरी केलेले सामान जप्त केले आहे.
सुरुवातीला अनेक तरुणांसोबत हा प्रकार घडला पण अनेकांनी घाबरुन किंवा लाजेने तक्रार केली नाही. पण विरार पश्चिम येथील एका तरुणाने मात्र याची तक्रार केली, ज्यानंतर पोलिस या प्रकरणाच्या मुळाशी गेले आणि त्यांनी अखेर आरोपीना पकडले.
22 नोव्हेंबर रोजी या तरुणाला एका लॉजमध्ये अशाच प्रकारे लुटण्यात आले. या घटनेत तरुणाने सुमारे 1.83 लाख रुपये किमतीची 20 ग्रॅम सोन्याची चेन, मोबाईल फोन आणि स्मार्ट वॉच गमावले. आरोपी तरुणींना पकडणे पोलिसांसाठी सोपे नव्हते, कारण त्या स्वतःला वाचवण्यासाठी अनेक युक्त्या वापरत होत्या. प्रत्येक घटनेनंतर त्या लगेचच डेटिंग ॲपवरील आपले प्रोफाईल डिलीट करत असत. लॉजमध्ये बुकिंग करताना त्या अपूर्ण आयडी कार्ड आणि चुकीचे फोन नंबर देत असत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या ऑनलाइन पेमेंट पूर्णपणे टाळत होत्या, जेणेकरून डिजिटल पुरावा मागे राहू नये.
आरोपी कोण आहेत?
या दोन तरुणींपैकी एक उत्तर मुंबईतील (North Mumbai) मालवणी भागातील आहे, तर दुसरी मूळची हिमाचल प्रदेशची आहे आणि ती सध्या मुंबईत राहत होती. दोघीही 20 वर्षांच्या आहेत. त्यांच्यावर कशिमीरा पोलीस स्टेशनमध्ये (Kashimira Police Station) देखील अशाच प्रकारचा एक गुन्हा नोंद आहे.
त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार (Bharatiya Nyaya Sanhita) 'चोरी', 'गुन्हा करण्याच्या हेतूने विषारी पदार्थ देऊन इजा पोहोचवणे' यांसारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सही घटना ऑनलाइन डेटिंग ॲप्स वापरणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठा इशारा आहे. अनोळखी व्यक्तींना भेटताना किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवताना अत्यंत सावधगिरी बाळगणे, ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.
