तिन्ही हत्यांची पद्धत सारखी असणे आणि प्रत्येक वेळी एकादशीचाच दिवस निवडला जाणे, यावरून हे प्रकरण 'तांत्रिक क्रियेशी' जोडलेले असू शकते, असा कुटुंबीयांचा दावा आहे. हा सामान्य गुन्हा नसून, बालकांची 'सिरीयल किलिंग' असल्याचे मत व्यक्त करत, पीडित कुटुंबाने आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पानिपत जिल्ह्यातील सिवाह गावात घडलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
advertisement
पूनमवर संशय जाण्याचे पहिले कारण ठरली, जिया या चिमुरडीची हत्या. जियाचे चुलते सुरेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी पूनम त्यांच्या घरी आली होती आणि त्याच रात्री ती जियासोबत घरात झोपली. सकाळी जिया गायब झाली. शोध घेतल्यावर तिचा मृतदेह घरातील पाण्याच्या टाकीत आढळला. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरले.
सुरेंद्र यांनी त्याचवेळी पूनमवर संशय व्यक्त केला होता. मात्र, जेव्हा पूनमला थेट विचारणा करण्यात आली, तेव्हा तिने रडून आत्महत्या करण्याची धमकी दिली. लोकलाजेमुळे आणि कुटुंबाचे नाव खराब होऊ नये म्हणून, कुटुंबीय त्यावेळी गप्प बसले. हीच शांतता त्यांना नंतर अधिक महाग पडली.
सध्याच्या घटनेनंतर, सुरेंद्र यांनी मागील घटनांचे धागेदोरे जोडून पाहिले. तेव्हा जो धक्कादायक योगायोग समोर आला, तो कोणत्याही सामान्य घटनेचा भाग नव्हता. तिन्ही घटना या एकादशीला झाल्या होत्या आणि तिन्ही वेळा हत्या करण्याची पद्धत सारखीच होती.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या हत्येनंतर पूनम सुमारे दीड वर्ष शांत होती, कारण ती त्या काळात स्वतः गर्भवती होती. जर ती गर्भवती नसती, तर आणखी किती चिमुकल्यांना तिच्या क्रूरतेचा बळी व्हावे लागले असते, या भीतीने संपूर्ण गाव हादरले आहे. आरोपी पूनमचा चुलत भाऊ असलेल्या सुरेंद्र यांनी प्रशासनाकडे उघडपणे मागणी केली आहे की, हे प्रकरण सामान्य खून नसून, बालकांची सिरीयल किलिंग आहे.
सुरेंद्र यांचे म्हणणे आहे की, पूनमला कोणत्याही परिस्थितीत आजीवन कारावास किंवा दहा-वीस वर्षांची शिक्षा पुरेशी नाही. जर तिला भविष्यात कधी पॅरोलवर सोडले, तर ती आणखी किती बालकांचा जीव घेईल, याचा अंदाज लावणेही कठीण आहे. न्याय केवळ फाशीच्या शिक्षेनेच पूर्ण होईल, असे कुटुंबाचे ठाम मत आहे.
कुटुंबीय आज यावर पश्चात्ताप करत आहेत की, जर सुरुवातीलाच लोकलाज न पाहता पोलिसांत तक्रार दाखल केली असती, तर कदाचित ही क्रूर घटना थांबवता आली असती.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अधिकारी प्रत्येक बाजूने या घटनेचा अभ्यास करत आहेत: ही तांत्रिक क्रिया होती की पूनमचा मानसिक विकाराचा भाग? या दिशेनं देखील तपास सुरु आहे.
पीडित कुटुंबाचा मात्र ठाम विश्वास आहे की, पूनम पूर्णपणे शुद्धीत होती आणि प्रत्येक वेळी एकादशीचा दिवस निवडणे, हे एका मोठ्या आणि क्रूर कटाचा भाग आहे. कुटुंबाने प्रशासनाला विनंती केली आहे की, या प्रकरणाच्या तपासात कोणतीही दिरंगाई न करता, आरोपीला तात्काळ आणि कठोर शिक्षा दिली जावी, जेणेकरून समाजातील इतर बालकांचे जीवन सुरक्षित राहील. संपूर्ण गावात सध्या प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण असून, सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले आहे.
