कराड शहरासह ग्रामीण भागात तोडफोड करत आणि व्यावसायिकांना जीवे ठार मारण्याची धमकी देत टोळीने अनेकांकडून खंडणी वसूल केली आहे. याबाबतचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात एक टोळी दुकानदारांकडून खंडणी वसूल करताना दिसत आहे. या प्रकरणी कराड शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर अटकेची कारवाई केली. तसेच या खंडणीखोर टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी या टोळीच्या म्होरक्याची पोलिसांनी शहरात धिंड देखील काढली.
advertisement
कराड शहरात तसेच तालुक्यातील वारूंजी आणि नारायणवाडी गावात गुंडाच्या टोळीने धुडगूस घालून तोडफोड करीत व्यावसायिकांकडून खंडणी वसूल केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी गुंडासह त्याच्या टोळीवर कराड शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या टोळीच्या म्होरक्याची पोलिसांनी शहरातील रस्त्यावरून चालत धिंड काढली.
मिळालेल्या माहितीनुसार, वारूंजी फाटा येथील एका मसाला दूध सेंटरमध्ये चार जणांनी महिन्याला चार हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर तुला धंदा करू देणार नाही, अशी धमकीही दूध व्यावसायिकाला दिली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी दूध व्यावसायिकाच्या दुकानाच्या गल्यातील पैसे जबरदस्तीने काढून घेत लोखंडी रॉडने दुकानातील काचेचे ग्लाससह इतर साहित्य फोडले.
याच टोळक्याने अथर्व देशमुख यांच्या कारच्या काचा फोडून सुमारे ६५ हजारांचे नुकसानही केले. याशिवाय नारायणवाडी येथे अनिल चंदवाणी यांना या टोळीतील आठ संशयितांनी वाईन शॉपमध्ये घुसून गोंधळ घालून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच साडेसहा हजाराच्या दारूसह इतर साहित्य नेलं, याबाबतची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. शहरातील अशा टोळक्यामुळे व्यावसायिक त्रासले असून पोलिसांनी वेळीच आवर घालण्याची मागणी केली जात आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.