'तुमच्या वाहनावर वाहतूक नियमभंगामुळे चलन झाले आहे, दंड भरा' असा मेसेज किंवा ॲप लिंक व्हॉट्सॲपवर पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ई- चलनाच्या नावाखाली पाठवली जाणारी ॲप्लिकेशन फाईल मोबाईलमध्ये आपोआप इन्स्टॉल होऊन फोन हॅक केला जात असून, काही मिनिटांतच बँक खात्यातील रक्कम गायब होत आहे. सायबर पोलिसांना मिळालेल्या तक्रारींनुसार, ठग नागरिकांच्या भीतीचा फायदा घेत अधिकृत सरकारी सेवेचा भास निर्माण करतात. 'चलान न भरल्यास कारवाई होईल' असा दबाव टाकत लिंक उघडण्यास भाग पाडले जाते. मात्र, ही लिंक अधिकृत नसून, त्यावर क्लिक करताच मोबाईलमध्ये घातक ॲप इन्स्टॉल होते.
advertisement
मोबाईल हॅक झाल्यानंतर ठगांना संपूर्ण फोनचा ॲक्सेस मिळतो. मोबाईल ॲक्सेस मिळाल्यानंतर ठग Mobile Net Banking आणि UPI यांचा वापर करून नागरिकांच्या खात्यातील रक्कम आपल्याकडे वळती करून घेतायत. युजरचा मोबाईल हॅक झाल्यानंतर त्याच्या मोबाइलवरून आपोआप कॉन्टेक्ट लिस्टमधील सर्व मित्र आणि नातेवाइकांना पैसे मागणारे मेसेज पाठवले जातात. ओळखीच्या व्यक्तीकडून आलेला मेसेज समजून अनेकजण पैसे ट्रान्सफर करतात आणि फसवणूक वाढते. त्यामुळे सायबर क्राइम पोलिसांकडून नागरिकांना अशा मेसेजेसपासून सावधानतेचा इशारा दिला आहे. असे मेसेजेस आल्यास थेट डिलिट करा किंवा अशांना थेट ब्लॉक तरी करा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
अॅपच्या अवैध लिंक्समुळे मोबाइलमधील फोटोजसह सर्व व्हिडिओज आणि डॉक्युमेंट्स हॅकरच्या ताब्यात जातात. खासगी माहितीचा गैरवापर, ब्लॅकमेलिंग किंवा पुढे फसवणुकीसाठी ही माहिती वापरली जाण्याची शक्यता आहे. सरकारी यंत्रणा कधीही व्हॉट्सॲपवर एपीके फाइल पाठवत नाहीत. ई-चलनाची माहिती फक्त अधिकृत वेबसाइटवरच उपलब्ध असते. अनोळखी पीडीएफ, झीप फाईल्स किंवा लिंक उघडू नये, फसवणूक झाल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधून बँक अकाऊंट आणि यूपीआय सेवा बंद कराव्यात, असे आवाहन आरटीओ आणि सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
