शिर्डी विमानतळ परिसरातील गुंजाळवस्तीत एका बापलेकाची भल्या पहाटे हत्या करण्यात आली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी बापलेकांना रक्तबंबाळ करत जीव घेतला आहे. या हल्ल्यात मयताची आई देखील गंभीर जखमी झाली आहे. भल्या पहाटे घडलेल्या या हल्ल्याची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली. सध्या जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा तपास सुरू आहे.
advertisement
साहेबराव भोसले (वय 60) आणि कृष्णा भोसले (वय - 30) असं हत्या झालेल्या बापलेकाचं नाव आहे. तर या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दरोड्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी घरातील सामानाची उचकलं असून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
भल्या पहाटे हत्येची ही घटना घडल्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. घरातील काही सामान चोरीला गेलं आहे का? या हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाल्या? यामागे नक्की काय उद्देश होता? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र शिर्डी संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येची घटना ताजी असताना आता बापलेकाची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.