मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोल्हापूरला लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. येथील रायबाग तालुक्याच्या नागराळ गावातील १९ वर्षीय तरुणी सुश्मिता हिचं गावातील विठ्ठल बस्तवाडे नावाच्या २९ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. विठ्ठल बस्तवाडे हा तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण सुश्मिताच्या कुटुंबीयांचा अशा प्रेमसंबंधांना विरोध असल्याने दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.
advertisement
सुश्मिताचे वडील चार मुलींचे पिता असून, सुश्मिता ही त्यांची सर्वात धाकटी आणि लाडकी मुलगी होती. मुलगी पळून गेल्याने 'घराण्याच्या संस्काराला धक्का बसला' या विचाराने वडील अत्यंत दुःखी झाले. आपल्यासाठी आता मुलगी जणू 'मेली' आहे, असे समजून त्यांनी मुलीच्या जिवंतपणीचं तिचं श्राद्ध घातलं आहे.
मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर सुरुवातीला मुलीच्या वडिलांनी रायबाग पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची (मिसिंग) तक्रार दिली. पण मुलगी स्वत:हून पळून गेल्याचं समजल्यानंतर त्यांनी थेट मुलीचा 'श्राद्ध' विधी आयोजित केला. यासाठी नातेवाईकांना आणि पाहुण्यांना बोलावून त्यांनी सुश्मिताच्या फोटोचे पूजन केले. फोटोला हार घालून श्राद्ध घातलं. लोकांना रुचकर जेवण दिले. मुलगी जिवंत असताना वडिलांनी तिचे श्राद्ध घातल्याने पंचक्रोशीत ही घटना चर्चेचा विषय बनली असून, लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.