शिक्षण विभागात मोठी खळबळ
मृतक महिला या शाळेत सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ही घटना उघडकीस येताच शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली. सतरिख पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या शिक्षिकेला 2 मुले असून त्यांचे पतीदेखील शिक्षण विभागातच दुसऱ्या एका शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
advertisement
बदलीसाठी प्रयत्न करत होत्या, पण...
या प्रकरणात मृत शिक्षिकेच्या पतीने शाळेतील इतर स्टाफवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, गेल्या अडीच वर्षांपासून शाळेतील काही कर्मचारी त्यांच्या पत्नीला सतत मानसिक त्रास देत होते. जेव्हा त्या मनापासून विद्यार्थ्यांना शिकवायच्या, तेव्हा इतर कर्मचारी त्यांच्यावर टोकाची टीका-टिप्पणी करायचे. या त्रासामुळे त्या बदलीसाठी प्रयत्न करत होत्या, मात्र त्यात यश मिळाले नाही, असे त्यांच्या पतीने सांगितले आहे.
खोलीचा दरवाजा आतून बंद नव्हता - भाऊ
मृत महिलेच्या भावाने या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. ज्या खोलीत फाशी घेतली, त्या खोलीचा दरवाजा आतून बंद नव्हता, असा दावा त्यांनी केला असून शाळेतील काही शिक्षकांची नावे घेत त्यांना जबाबदार धरले आहे. "मोठी शिकवणारी आली, हिला काय अवॉर्ड हवाय का?" अशा शब्दांत इतर कर्मचारी त्यांची छेड काढत असत, असा आरोप कुटुंबाने केला आहे. गेल्या अडीच वर्षापासून तिचा छळ सुरू होता, अशी माहिती मिळाली आहे.
घटनेच्या दिवशीच फोन झाला...
दरम्यान, घटनेच्या दिवशी सकाळी 10.30 च्या सुमारास पत्नीशी फोनवर बोलणं झालं होतं, तेव्हा त्या फारशा चिंतेत वाटत नव्हत्या, असं पतीने नमूद केलं. तसेच, शाळेतील सहकाऱ्यांनी त्यांना लटकलेल्या अवस्थेत पाहिलं असूनही वेळेवर हॉस्पिटलमध्ये का नेलं नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर वेळीच मदत मिळाली असती, तर कदाचित आज त्यांची पत्नी जिवंत असती, अशी खंत पतीने व्यक्त केली आहे.
