पुण्यातील कोथरुड भागात एका तरुणाला एका टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. गाडी आडवी लावल्याच्या कारणावरुन पीडित तरुणाचा आरोपींसोबत वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी एकत्र येत एका तरुणाला मारहाण केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. सचिन मिसाळ असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर अक्षय लोणकर असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. शुक्रवारी ७ मार्चला दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी ही मारहाण झाली आहे. या मारहाणीत अक्षय लोणकर जखमी झाला आहे. त्याचं डोकं फुटलं असून त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली होती. त्यामुळे त्याचा शर्ट पूर्णपणे रक्ताने माखला होता.
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सचिन मिसाळसह त्याच्या साथीदारांवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरुड मधील एमआयटी कॉलेजच्या गेट समोर गाडी आडवी लावण्याच्या कारणातून या आरोपींचा अक्षयसोबत वाद झाला होता. याच वादातून सचिन मिसाळने आपल्या काही साथीदारांसह अक्षयवर हल्ला केला. या हल्ल्यात अक्षय जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.