हे अत्यंत धक्कादायक प्रकरण होतं. या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव डॉमिनिक पेलिकोट असं आहे. तो 72 वर्षांचा आहे. पोलिसांना त्याच्याकडे 20 हजारांहून अधिक आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओज सापडले. हे सारं इतकं धक्कादायक होतं, की तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाही धक्का बसला होता. 2020 साली ही गोष्ट पहिल्यांदा उघड झाली. कारण त्या वेळी डॉमिनिक व्हिडिओ बनवताना पकडला गेला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीच्या बाबतीत त्याने केलेलं दुष्कृत्य उघड झालं होतं.
advertisement
डॉमिनिकने आता आपले गुन्हे कबूल केले असून, त्याला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याने ज्या 72 व्यक्तींना आपल्या पत्नीवर बलात्कार करायला दिला होता, त्यांपैकी 50 व्यक्तींची ओळख पटवण्यात आली. त्यांपैकी अनेकांना पाच ते 13 वर्षांची सजा सुनावण्यात आली आहे. अनेक आरोपींनी स्वतः निर्दोष असल्याचा दावा केला. कारण त्यांना गिझेल म्हणजे डॉमिनिकची पत्नी कोणत्या अवस्थेत होती, याची कल्पना नव्हती, असं त्यांनी सांगितलं.
डॉमिनिकने 1973 साली गिझेल नावाच्या महिलेशी विवाह केला. या दाम्पत्याला तीन मुलं झाली. 2011 साली डॉमिनिकने गिझेलच्या जेवणात गुंगीचे पदार्थ मिसळण्यास सुरुवात केली. त्यामुळे गिझेल बराच काळ गुंगीत राहू लागली. तसंच, तिला विस्मरणाचा त्रास होऊ लागला. 2013मध्ये डॉमिनिकने सेवानिवृत्त झाल्यानंतर गिझेलला गुंगीचं औषध देऊन अज्ञात व्यक्तींना तिच्यावर बलात्कार करण्यासाठी बोलवायला सुरुवात केली. तो एकदम माथेफिरूच झाला होता. त्याच्या या कृत्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्याच्या पत्नीने स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात दाद मागितली. तिने आपली ओळखही लपवली नाही, तर सार्वजनिकरीत्या समोर येऊन न्यायाची मागणी केली. अखेर तिला न्याय मिळाला आहे. गिझेलने न्यायालयाबाहेर आभार व्यक्त केले. तसंच, भविष्यात महिला आणि पुरुषांना समाजात सन्मानाची वागणूक मिळेल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर फ्रान्समध्ये बलात्कार प्रकरणावरच्या चर्चेला अधिक जोर आला आहे. लैंगिक असमानता आणि बलात्कार यांबद्दल सर्वसाधारण भूमिका घेण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महिलांच्या अधिकारांसाठी फ्रान्समध्ये लढणाऱ्या व्यक्ती या प्रकरणामुळे एकत्र आल्या आहेत. देशात लैंगिक गुन्ह्यांबद्दलचे कायदे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कडक धोरण अवलंबण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
