भारती सुरेंद्र सहारे असं हत्या झालेल्या ४४ वर्षीय महिलेचं नाव आहे. पतीच्या निधनानंतर त्या आपल्या मुलासह गोंदिया तालुक्यातील दासगाव बुज इथं राहत होत्या. त्या नड्डे आणि अंडी विकून घर चालवत होत्या. आरोपी मुलगा हा त्यांचा एकुलता एक आधार होता. पण याच मुलाने भारती यांची हत्या केली. खर्चासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून १७ वर्षीय आरोपीनं आपल्या भारती यांची हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे.
advertisement
गळा दाबला, जमिनीवर डोकं आपटलं
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय आरोपी मुलगा कोणतंही काम करत नव्हता. तो सातत्याने खर्चासाठी आईकडे पैसे मागायचा. पण पोटाला चिमटा काढून घर चालवणाऱ्या भारती यांच्याकडे फारसे पैसे नसायचे. पण आरोपी मुलगा पैंशासाठी आईशी अनेकदा वाद घालायचा. घटनेच्या दिवशी गुरुवारी (दि.२६) रात्री दोन्ही मायलेकांत याच कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मुलाने भारतीचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले, यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला व मेंदूत रक्त गोठून त्यांचा मृत्यू झाला.
हत्याकांड लपवण्याचा प्रयत्न
आईच्या हत्येनंतर आरोपीनं तिचा मृत्यू आजारपणाने झाल्याचा बनाव रचला. तसं नातेवाईकांना फोन केला. शुक्रवारी तातडीने गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही करण्यात आले. नातेवाईकांची दिशाभूल करत मुलाने आईचा अंत्यसंस्कार केला. पण हिवराचे पोलीस पाटील विनोद ईस्तारू नंदेश्वर (४५) यांना भारती यांच्या मृत्यूबाबत संशय आला. त्यांनी शनिवारी (दि.२८) रावणवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत आरोपी मुलाला अटक केली. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.