27 वर्षीय इस्रायली तरुणीसह इतर दोन महिलांवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. कोप्पलचे पोलीस अधीक्षक राम एल अरासिद्दी म्हणाले, "आम्ही तीनपैकी दोघांना अटक केली आहे. तिसऱ्या संशयिताला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत." मल्लेश आणि चेतन साई अशी आरोपींची ओळख पटली आहे. दोघेही २१ वर्षांचे आहेत. दोघेही गंगावती येथील साई नगरचे रहिवासी आहेत. ते गवंडी म्हणून काम करतात.
advertisement
अचानक आले अन् १०० रुपये मागितले
ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. रात्रीच्या जेवणानंतर, २९ वर्षीय होमस्टे ऑपरेटर, इस्रायली पर्यटक आणि तीन पुरुष पर्यटकांसह, सानापूर तलावाजवळील तुंगभद्रा कालव्याच्या बाजुला गिटार वाजवत होते, संगीताचा आनंद घेत होते. याचवेळी दुचाकीवरून तीन पुरुष घटनास्थळी आले. त्यांनी पेट्रोल कुठे मिळेल, असे विचारलं. तेव्हा होमस्टे ऑपरेटरने त्यांना सांगितलं की जवळ पेट्रोल पंप नाही. तुम्हाला पेट्रोलसाठी सानापूरला जावं लागेल. यानंतर एका आरोपीने पीडितेकडं १०० रुपये मागितले. होमस्टे ऑपरेटर त्यांना ओळखत नव्हती, म्हणून तिने त्यांना सांगितले की तिच्याकडे पैसे नाहीत. जेव्हा आरोपींनी पैशांसाठी आग्रह करायला सुरुवात केली, तेव्हा घटनास्थळी असलेल्या ओडिशातील एका पुरुष पर्यटकाने त्यांना २० रुपयांची नोट दिली.
दगडाने डोकं फोडण्याची धमकी
यानंतर तिन्ही आरोपी संतापले. त्यांनी भांडणे सुरू केली. त्यांनी दगडांनी त्यांचे डोके फोडण्याची धमकी दिली. कन्नड आणि तेलुगू बोलणाऱ्या आरोपींनी पर्यटकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी होमस्टे ऑपरेटर आणि इस्रायली तरुणीवर बलात्कार केला. तसेच तीन पुरुष पर्यटकांना त्यांनी कालव्यात ढकलून दिलं. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, "दोन आरोपींनी होमस्टे ऑपरेटरला मारहाण केली, तर तिसऱ्याने आक्रमकपणे तीन पुरुष पर्यटकांना कालव्यात ढकलले. यानंतर तिन्ही आरोपींनी होमस्टे ऑपरेटरलाही मारहाण केली."
कालव्याच्या काठावर ओढून नेत बलात्कार
आरोपींनी तिला ओढत एका कालव्याच्या काठावर नेले, जिथे एकाने तिचा गळा दाबला आणि तिचे कपडे काढले. त्यापैकी दोघांनी तिला मारहाण केली आणि बलात्कार केला. त्यांनी त्याची बॅगही हिसकावून घेतली. बॅगेतील दोन मोबाईल फोन आणि ९,५०० रुपये रोख रक्कम काढून घेण्यात आली. दुसरीकडे एकाने इस्रायली तरुणीला ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. गुन्हा केल्यानंतर आरोपी मोटारसायकलवरून पळून गेला. तीन पुरुष पर्यटकांपैकी दोघे जखमी झाले आणि एक बेपत्ता झाला. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीच्या आधारे, भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गंगावती ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेला घृणास्पद कृत्य म्हटले आहे. ते म्हणाले, "घटनेची माहिती मिळताच मी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मी पोलिसांना सखोल तपास करण्याचे आणि लवकरच गुन्हेगारांची ओळख पटविण्याचे निर्देश दिले."
